मनेरिया, भाटियाची अर्धशतके *  अजिंक्य रहाणेची शतकी खेळी व्यर्थ
अशोक मनेरिया आणि रजत भाटिया यांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ मुंबईवर थरारक विजय मिळवला.
भारतीय संघाचा आधारस्तंभ झालेल्या अजिंक्य रहाणेने प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबईसाठी खेळताना शतकी खेळी साकारली. अजिंक्यने राजस्थानच्या कमकुवत गोलंदाजीचा समाचार घेताना १० चौकार आणि २ षटकारांसह ११२ चेंडूत ११४ धावांची वेगवान खेळी केली. यंदाच्या हंगामात झंझावाती फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यर तसेच फॉर्मसाठी झगडणाऱ्या कर्णधार आदित्य तरेला भोपळाही फोडता आला नाही. सूर्यकुमार यादवने ५२ धावा करीत अजिंक्यला चांगली साथ दिली. इक्बाल अब्दुल्लाने ३१, तर अभिषेक नायरने २५ धावांची उपयुक्त खेळी केली. मुंबईने ३०१ धावांचा डोंगर उभारला. अनुभवी गोलंदाज पंकज सिंगने ४ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना, दिशांत याज्ञिक (४०) आणि पी. आर. यादव (४९) यांनी चांगली सुरुवात केली. हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईला सामन्यावर पकड मिळवण्याची संधी होती. मात्र अशोक मनेरिया आणि रजत भाटिया यांनी चौथ्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी करीत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मनेरियाने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८६, तर भाटियाने ८ चौकार आणि ३ षटकारांसह खेळताना नाबाद ९४ धावांची खेळी साकारली. मुंबईचा प्रमुख गोलंदाज शार्दूल ठाकूरच्या १० षटकांत ८५ धावा कुटल्या गेल्या. मुंबईचा कर्णधार आदित्य तरेने सात गोलंदाजांचा उपयोग करीत धावसंख्येला वेसण घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशीच ठरला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : ५० षटकांत ९ बाद ३०१ (अजिंक्य रहाणे ११४, सूर्यकुमार यादव ५२, पंकज सिंग ४/५५) विजयी विरुद्ध राजस्थान : ४९ षटकांत ५ बाद ३०५ (रजत भाटिया नाबाद ९४, अशोक मनेरिया ८६, अभिषेक नायर २/२८).