भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने Yasar Dogu International कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ५३ किलो वजनी गटात विनेशने रशियाची प्रतिस्पर्धी एक्तेरिना पोलेशुचूकचा पराभव केला. विनेशने अंतिम सामन्यात रशियाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत ९-५ ने सामन्यात बाजी मारली.

दुसरीकडे पुरुषांच्या फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारात, महाराष्ट्राच्या राहुल आवारेने ६१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. राहुलचं हे पहिलं Career Ranking Series सुवर्णपदक ठरलं आहे. राहुलने तुर्कीच्या मुनीर अक्तासचा ४-१ ने पराभव केला. याच प्रकारात महाराष्ट्राचा आणखी एक मल्ल उत्कर्ष काळेने कांस्यपदकाची कमाई केली.

बजरंग पुनियाच्या अनुपस्थितीत ६५ किलो वजनी गटात मराठमोळ्या सोनबा तानाजी गोंगाणेला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. मात्र कांस्यपदकाच्या लढाईत त्याला तुर्कीच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.