श्रीलंकेवर भारताने ५-० असा दणदणीत विजय मिळविला असून कर्णधार विराट कोहलीने संघातील सकारात्मक आणि आक्रमक वृत्तीची प्रशंसा केली आहे. पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर तीन विकेट्सने रविवारी विजय मिळविला.
‘संघांमध्ये आक्रमक आणि सकारात्मक वृत्ती पाहायला मिळाली, संघात कुठेच बचावात्मक आणि नकारात्मक वृत्ती दिसली नाही. आमच्यासाठी हेच फार महत्त्वाचे आहे. या गोष्टीसाठीच आम्ही बरेच दिवस प्रयत्नशील होतो. या मालिकेत संघाकडून ते पाहायला मिळाले. याबाबत आम्ही बरीच चर्चा केली होती, या चर्चेचा आम्हाला चांगलाच फायदा झाला. या मालिकेत संघातील सर्वच खेळाडूंनी सुंदर खेळ केल्यामुळे श्रीलंकेवर मोठा विजय आम्हाला मिळविता आला,’’ असे कोहली म्हणाला.
आशियाई खंडातील दोन संघ एकमेकांसमोर आले की तुंबळ युद्ध पाहायला मिळते, असे म्हटले जाते. पण अखेरचा सामना वगळल्यास या मालिकेत तसे काहीच दिसले नाही.
‘आशियाई संघाला या वातावरणात पराभूत करणे नक्कीच सोपे नसते, कारण वातावरण आणि खेळपट्टय़ा या जवळपास सारख्याच असतात. संघातील खेळाडूंमध्ये असलेली कामगिरीची भूक आमच्या पथ्यावर पडली. सर्व खेळाडूंनी जीव लावून कामगिरी केली आणि त्याचेच फळ आम्हाला मिळाले. कर्णधार म्हणून या कामगिरीने मी समाधानी आहे,’’ असे कोहली म्हणाला.

पराभव लवकरच विसरावा लागेल – मॅथ्यूज
एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेला ०-५ असा पराभव स्वीकारावा लागला असला तरी यामधून काही सकारात्मक गोष्टी पुढे आल्या आहेत, पण हा पराभव लवकरच आम्हाला विसरावा लागेल, असे मत कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने व्यक्त केले आहे.
‘आगामी इंग्लंडविरुद्ध आम्ही मालिका खेळणार असल्यामुळे आम्हाला हा पराभव लवकरच विसरावा लागेल. संघामध्ये जास्त अनुभवी खेळाडू नाहीत. युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी द्यायला हवी, असे मला वाटते. काही युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असली ती एकसंध नव्हती आणि त्यामुळेच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. लहिरू थिरीमानेने या मालिकेत दमदार फलंदाजी केली. संघात सुधारणेला अजून बराच वाव असून त्यासाठी आम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे,’’ असे मॅथ्यूज म्हणाला.

भारतातील मानहानीकारक पराभवाची जबाबदारी जयसूर्या यांनी स्वीकारली
कोलंबो : ऐनवेळी ठरलेल्या भारतीय दौऱ्यातील मानहानीकारक पराभवाची जबाबदारी श्रीलंकेचे निवड समिती अध्यक्ष आणि माजी सलामीवीर सनथ जयसूर्या यांनी स्वीकारली आहे. जयसूर्या हे क्रीडा उपमंत्रीही असून संसदेमध्ये त्यांनी भारतीय दौऱ्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘‘या पराभवासाठी क्रीडामंत्री किंवा अन्य कोणालाही जबाबदार धरू नये. या पराभवाची जबाबदारी मी घेत आहे,’’ असे जयसूर्या म्हणाले. भारतीय दौऱ्यानंतर श्रीलंकेतील स्थानिक पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जयसूर्या यांनी सांगितले.

 कोहली क्रमवारीत दुसऱ्या स्थानी
पीटीआय, दुबई
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार प्रदर्शन करणाऱ्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदच्या (आयसीसी) फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. चौथ्या एकदिवसीय लढतीत २६४ धावांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवणाऱ्या रोहित शर्माने १८ स्थानांनी सुधारणा करीत १५वे स्थान पटकावले आहे. शिखर धवन पाचव्या तर महेंद्रसिंग धोनी सातव्या स्थानी स्थिर आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत १०वे स्थान मिळवले आहे.