जागतिक कसोटी लढतीबाबत वेंगसरकर यांचा इशारा

पीटीआय, मुंबई

मागील तीन महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता थेट जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी मैदानात उतरणे विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंसाठीही घातक ठरू शकते, असा इशारा भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी दिला आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साऊदम्पटन येथे जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र पुढील ११ दिवसांत भारतीय संघ एकही सराव सामना किंवा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना न खेळता थेट अंतिम फेरी खेळणार आहे. त्याच वेळी न्यूझीलंडची इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू असल्यामुळे त्यांना भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याची उत्तम संधी आहे. भारताने मार्चमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला आहे.

‘‘भारताचे पारडे निश्चितच जड आहे. कर्णधार कोहली, रोहित हे दोघेही उत्तम लयीत असून त्यांच्यावर फलंदाजीची प्रामुख्याने भिस्त आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असल्यामुळे थेट इंग्लंडमधील वातावरणात हा सामना खेळणे कोहली, रोहितसह अन्य भारतीय खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरू शकते,’’ असे ६५ वर्षीय वेंगसरकर म्हणाले.

‘‘विदेशी दौऱ्यावर तुम्ही नेटमध्ये कितीही सराव केला किंवा सराव सामने खेळलात, तरी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावर घालवलेला वेळ त्यापेक्षा अमूल्य असतो. त्यामुळे भारतानेसुद्धा या लढतीपूर्वी इंग्लंडमध्ये किमान एक किंवा दोन कसोटी सामने खेळणे गरजेचे होते. यामुळे त्यांना तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यात मदत झाली असती. खेळाडूंनाही आपल्या कामगिरीचा आढावा घेता आला असता,’’ असे वेंगसरकर म्हणाले.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा