भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी २० क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा गुरुवारी केली. या घोषणेमुळे त्याच्या चाहत्यांना बसला असला तरी हा निर्णय एकाएकी किंवा तडकाफडकी घेण्यात आलेले नाही. कोहलीने पद सोडण्याची तयारी मागील काही महिन्यांपासून सुरु केल्याची बातमी आता समोर येत आहे. कोहलीने कामाच्या विभागणीचं व्यवस्थापन करण्याचं सांगत टी २० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं. मात्र जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यानंतरच त्याच्या फलंदाजीवर झालेला परिणाम आणि सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तो टी २० चं कर्णधारपद सोडेल असं म्हटलं जातं होतं. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान पार पडणाऱ्या टी २० विश्वचषकानंतर कोहली या पदावरुन पायउतार होणार आहे.

विराट विरुद्ध बीसीसीआय…

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार निवड समितीमधील नवीन सदस्य आणि प्रशिक्षणासंदर्भातील बदलांमुळे विराट समोरील आव्हाने वाढली होती. याच वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरोधातील एक दिवसीय मालिकेमध्ये कोहलीला शिखर धवन संघामध्ये हवा होता. मात्र बीसीसीआयचं म्हणजेच भारतीय क्रिकेट नियमन मंडळाच्या निवडकर्त्यांचं मत वेगळं होतं. धवनला संघात घेण्यावरुन बीसीसीआय आणि विराटमध्ये वाद झालेला. धवनऐवजी विजय हजारे चषकामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर खेळाडूला संघात संधी देण्याचा निवडकर्त्यांचा विचार होता. मात्र विराटला शिखर धवनचं आपल्या संघात सलामीवीर म्हणून हवा होता, अशी माहिती समोर आलेली. अखेर धवनचीच निवड करण्यात आली होती.

पाच दिवसांचा वेळ घेतला

या संघर्षानंतर निवडकर्त्यांना विराटच्या बाजूने झुकतं माप दिलं. त्यानंतरही श्रीलंकन दौऱ्यावर भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धवनला पाठवलं असलं तरी धवनसंदर्भात निवड समितीचं मत मार्चपासूनच थोडं तळ्यात मळ्यात प्रकारचं होतं. मार्च महिन्यामध्येही इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिकेचा संघ घोषित करताना निवड समितीने पाच दिवसांचा वेळ घेतला होता. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये झालेला वाद वगळल्यास अशाप्रकारचा कोणताच वाद कर्णधार आणि निवड समितीमध्ये नाहीय. कोहलीला त्याने दिलेलं योगदान सिद्ध करण्याची गरज नसल्याचं मत त्याच्या निकटवर्त्यांनी व्यक्त केलंय. कोहलीवरील ताण कमी करण्यासाठी बीसीसीआयने त्याच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाला होकार दिल्याचं समजतंय.

बुधवारी झाली बैठक…

समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी विराट आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह तसेच मुख्य निवडकर्त्यांसोबत बैठक झाली. याचवेळी विराटने आपला निर्णय बीसीसीआयला कळवला. त्याने टी २० संघाचं कर्णधारपद सोडण्याची इच्छा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना बोलून दाखवली. विश्वचषकाआधीच यासंदर्भात बोलल्याने निवडकर्त्यांना आणि बीसीसीआयला वेळ मिळेल असं विराटचं म्हणणं होतं. विराटने आपण टी २० संघाचं कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा मात्र बुधवारी केली. जय शाह यांनी यानंतर मत व्यक्त करताना विराट आयपीएलमध्ये बंगळुरुच्या संघाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करेल असं म्हटलंय.