नवीन वर्षात आपला पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहासाची नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान यजमान संघाला पेलवलं नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत चांगले प्रयत्न केले, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली.

अवश्य वाचा – एका फटक्यात सगळे हिशोब चुकते ! न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडियाने रचला इतिहास

अंतिम सामन्यात भारतीय संघाने विराट कोहलीला विश्रांती देत रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवलं. मात्र रोहितही फलंदाजीदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे गोलंदाजीदरम्यान लोकेश राहुलने कर्णधारपदाची भूमिका निभावली. ५-० या मालिकाविजयासह कर्णधार विराट कोहलीच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा दोन देशांमधील मालिका जिंकण्याचा विक्रम विराटच्या नावे जमा झालेला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु-प्लेसिसचा विक्रम मोडीत काढला.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन देशांमधली मालिका सर्वाधिकवेळा जिंकणारे कर्णधार ( १५ पेक्षा जास्त सामन्यांत नेत्तृत्व केल्याचा निकष ) –

  • विराट कोहली – १० विजय*
  • फाफ डु-प्लेसिस – ९ विजय
  • इयॉन मॉर्गन – ७ विजय
  • डॅरेन सॅमी – ६ विजय

टी-२० मालिकेचं आव्हान संपल्यानंतर भारतीय संघ वन-डे मालिकेसाठी सज्ज होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारत ३ वन-डे आणि त्यानंतर २ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कोणालाही न जमलेली कामगिरी बुमराहने करुन दाखवली, तुम्हालाही वाटेल अभिमान