भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेससाठी किती जागरूक असतो हे तुम्हाला माहित आहे. फिटनेससाठी तो खास डायट प्लानही फॉलो करतो. अनेक मुलाखतीमध्ये विराट कोहलीने आपल्या फिटनेसचे रहस्य उलघडले आहे. चाहत्यासोबत आपल्या संघातील खेळाडूंनाही फिटनेस कशी राखावी याबाबत सांगत असतो. जिममध्ये घाम गाळातानाचे व्हिडीओ विराट कोहलीने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओतून तरुणांना व्यायाम करण्यासाठी तो नेहमी प्रोत्साहन देत असतो. असाच एक व्यायाम करतानाचा व्हिडीओ विराटने नुकताच ट्विट केला आहे. या व्हिडीओत विराट कोहली २०१६ आणि २०१९ अशा दोन वर्षात  जिमध्ये व्यायाम करताना दिसतोय.

“कधीही वजन उचलण्यापूर्वी त्यासाठी लागणारे योग्य तंत्र शिकून घ्यावे, कोणतेही नवीन तंत्र शिकण्यासाठी एकाग्रता व पूरेसा वेळ द्यावा लागतो. मी देखील गेली तीन वर्ष एकाग्रतेने हे वजन उचलण्याचे तंत्र शिकत आहे. आणि आता अनेक दिवसांच्या सरावानंतर त्यात मी तरबेज झालो आहे. कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे.” असे कॅप्शन विराटने त्या व्हिडीओला दिले आहे.

अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा फिटनेस हा माझ्यासाठी अधिक महत्वाचा आहे. असे विराटने आजवर दिलेल्या आपल्या अनेक मुलाखतीत सांगीतले आहे. विराटचा चांगला फिटनेस त्याच्या खेळातून दिसून येतो. फिटनेस राखण्यासाठी तो व्यायामशाळेत तासनतास घाम गाळतो. फिटनेसबरोबरच तो संतुलीत आहार देखील घेतो. तसेच फिटनेसबाबत विराट कधीच तडजोड करत नाही.