भारतीय संघाची सूत्र आपल्या हाती आल्यानंतर विराट कोहलीने प्रत्येक सामन्यात आपला ठसा उमटून दाखवला आहे. मैदानात आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जाणारा विराट कोहली, आपल्या फिटनेसबद्दलही तितकाच सजग असतो. बऱ्याचदा विराट आपले व्यायाम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. अनेक माजी क्रिकेटर फिटनेस आणि खेळातील तंत्र शिकून घ्यायचं असेल तर विराटची फलंदाजी पाहा असा सल्ला देतात. बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज तमिम इक्बालनेही विराटच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. विराटला व्यायाम करताना पाहिलं की माझीच मला लाज वाटते असं इक्बाल म्हणाला.

“भारत आमचा शेजारी देश आहे त्यामुळे भारतात काय घडतंय याकडे आमचं लक्ष असतं. भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांमध्ये फिटनेसकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलंय ते पाहून बांगलादेशमध्येही अनेक खेळाडू प्रेरित झाले आहेत. विराट कोहली आणि मी साधारण एकाच वयाचे आहोत, पण मला हे जाहीर सांगायला काहीच वाटत नाही…पण २-३ वर्षांपूर्वी ज्यावेळी मी विराटला मैदानात धावताना किंवा सराव करताना पहायचो, तेव्हा त्याचा फिटनेस पाहून माझीच मला लाज वाटायची. माझ्याच वयाचा एक खेळाडू फिटनेसवर एवढं लक्ष देतोय आणि मी त्याच्या अर्धीही कामगिरी करु शकत नाही.” तमिम इक्बाल ESPNCricinfo च्या पॉडकास्टमध्ये बोलत होता.

सध्या लॉकडाउन काळात सर्व क्रिकेट सामने बंद आहेत. तरीही विराट कोहली मुंबईत आपल्या राहत्या घरी व्यायाम करत आहे. सोशल मीडियावर विराटने अनेकदा आपले व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तब्बल दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा बंद असल्यामुळे आयसीसी व सर्व क्रिकेट बोर्ड आंतरराष्ट्रीय सामने कसे सुरु करता येतील या प्रयत्नात आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना पुढचा काही काळ आपल्या खेळाडूंना मैदानात पाहण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.