भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदने रशियाच्या पिटर स्विडलरचे आव्हान सहज परतवून लावताना कँडिडेट्स बुद्धिबळ स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत पुनरागमन केले आहे. सहाव्या फेरीत स्विडलरवरील विजयानंतर आनंद ३.५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
राजाच्या समोरील प्याद्याची चाल खेळून आनंदने डावाची सुरुवात केली. स्विडलरनेही त्याला त्याच चालीने उत्तर दिले. १३व्या चालीपर्यंत दोन्ही खेळाडूंनी सावध खेळावर भर दिला, परंतु स्विडलरने प्यादी मारून आनंदवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आनंदनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
आनंदने आक्रमक पवित्रा घेत वझीरला स्विडलरच्या चमूत घुसवले आणि त्याच्या पाठीशी घोडा व हत्तीची पर्यायी फौज उभी केली. या चक्रव्यूहात अडकलेल्या स्विडलरने २४व्या चालीत पराभव पत्करला.

सिंधू पराभूत
बेसेल : भारताच्या पी.व्ही. सिंधूला स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या ही बिंगजिओने सिंधूवर २१-१३, २१-१५ अशी मात केली. ऑल इंग्लंड स्पर्धेत सिंधूला सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला. सायना नेहवाल आणि प्रणॉयवर भारताचा आशा आहेत.