भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदला सिंक्वेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत अद्याप सूर सापडलेला नाही. त्याला दुसऱ्या लढतीत रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुकने पराभवाचा दणका दिला. पहिल्या लढतीत आनंदला हिकारू नाकामुराने हरवले होते.
पहिल्या फेरीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच आनंदला ग्रिसचुकविरुद्ध प्रथमच हार मानावी लागली. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनावर निसटता विजय मिळवला. बल्गेरियाच्या व्हॅसेलीन तोपालोव्हने विजयी मालिका सुरू ठेवताना नाकामुरावर एकतर्फी विजय नोंदवला. डच खेळाडू अनीश गिरीने अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. मॅक्झिम व्हॅचिअर लाग्रेव्हने लिव्हॉन आरोनियनला बरोबरीत रोखले. दुसऱ्या फेरीअखेर तोपालोव्हने दोन गुणांसह आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे. आरोनियन, लाग्रेव्ह व गिरी यांचा प्रत्येकी दीड गुण झाला आहे. नाकामुरा व ग्रिसचुक यांचा प्रत्येकी एक गुण असून कारुआना व आनंद यांना अद्याप खाते उघडता आलेले नाही.
आनंदने या स्पर्धाच्या मालिकेतील नॉर्वेमध्ये झालेल्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु पहिल्या फेरीपाठोपाठ दुसऱ्या फेरीतही त्याने निराशा केली. नॉर्वेतील स्पर्धेत आनंदने ग्रिसचुकविरुद्ध जे डावपेच वापरले होते, त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा आनंदने प्रयत्न केला, मात्र या वेळी ग्रिसचुकने त्याच्यावर बाजी पलटवली. डावाच्या मध्यास एक प्यादे गमावल्यानंतर आनंदची बाजू विस्कळीत झाली. त्याचा फायदा घेत ग्रिसचुकने केवळ ३५ चालींमध्ये विजय मिळविला.
कार्लसन व कारुआना यांच्यातील डाव विलक्षण रंगतदार झाला. सुरुवातीला कार्लसनची स्थिती चांगली होती, मात्र डावाच्या मध्यास कारुआनाने आघाडी घेतली होती. ४०व्या खेळीला कार्लसन पराभवाच्या छायेत सापडला होता. पण वेळेच्या बंधनात चाली करण्याच्या प्रयत्नात कारुआनाने घोडचूक करीत डाव गमावला.
नॉर्वेतील टप्प्यात विजेता ठरलेल्या तोपालोव्हने येथेही सुरेख खेळाची मालिका कायम राखली आहे. त्याने नाकामुरावर ७३ चालींमध्ये विजय नोंदविला.