शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठतेने झालेल्या सहाव्या डावात मॅग्नस कार्लसन याने विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद याला पराभूत केले आणि विश्व बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या लढतीत ४-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. पाचव्या डावाप्रमाणेच हा डावही बरोबरीत ठेवणे शक्य होते, मात्र कार्लसनने कल्पकतेचा प्रत्यय घडवित विजय मिळविला. हा डाव पाच तास चालला होता.
पाचव्या डावातील पराभवानंतर लढतीत आव्हान टिकविण्यासाठी आनंद सहाव्या डावात विजय मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करील अशी अपेक्षा होती. त्यातही पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळण्याचा तो कसा फायदा घेतो याचीच उत्सुकता निर्माण झाली होती. त्याने राजाच्या पुढील प्यादाने डावाची सुरुवात केली. त्याला कार्लसन यानेही राजाच्या प्याद्यानेच उत्तर दिले. पाचव्या चालीस कार्लसन याने कॅसलिंग केले. पुढच्या चालीस आनंदनेही कॅसलिंग करीत राजा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डावाच्या मध्यास दोन्ही खेळाडूंनी घोडे व उंटांच्या साहाय्याने आक्रमण केले. एकमेकांचे मोहरे घेण्यावरच त्यांचा भर होता.
आनंद व कार्लसन यांनी सुरुवातीस वजिरा-वजिरी करण्याचा मोह टाळला. ३१ व्या चालीस प्रत्येकी सहा प्यादी, एक हत्ती व एक वजीर अशी समान स्थिती होती. ३९ व्या चालीस कार्लसन याने आनंदचे एक प्यादे जिंकले. पाठोपाठ दोन्ही खेळाडूंनी ४० व्या चालीस वजिरा-वजिरी केली. ४४ व्या चालीस कार्लसनकडे दोन प्याद्यांची आघाडी होती. ४९ व्या चालीस आनंदने त्यापैकी एक प्यादे पुन्हा मिळविले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या राजास शह देण्यावर भर दिला. ६१ व्या चालीस आनंदने एका प्याद्याची आघाडी मिळविली. तथापि त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. कार्लसन याने एका प्याद्याचे वजिरात रुपांतर करण्यासाठी कल्पकतेने चाली केल्या.
डावाच्या शेवटी आनंद दडपणाखाली खराब खेळतो हे येथे पुन्हा सिद्ध झाले. कार्लसन याच्या प्याद्याचा वजीर होणार किंवा ते टाळण्यासाठी हत्ती गमवावा लागणार हे लक्षात आल्यामुळे आनंदने ६७ व्या चालीअखेर पराभव मान्य केला.