वैयक्तिक आणि सांघिक प्रकारामध्ये कांस्यपदक

भारताच्या विवान कपूरने कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या ट्रॅप प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही गटांमध्ये कांस्यपदक मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाच सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्यपदक मिळवली आहेत.

कपूरला याआधी इटलीत झालेल्या जागतिक स्पर्धेत १८वे स्थान मिळाले होते. १६ वर्षांच्या कपूरने या अपयशापासून बोध घेत येथे उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने ४० नेमांपैकी ३० नेम साध्य केले व चीन तेपैईच्या कुनपी यांग (२६) याच्यावर मात केली. इटलीच्या १८ वर्षीय मतेवू मरोंगुईला सोनेरी यश मिळाले, तर चीनच्या ओयुंग यिलुयूने रुपेरी कामगिरी केली. मरोंगुईने गतवर्षी शॉटगनच्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. कपूरने लक्ष्यकुमार व अली अमन इलाही यांच्या साथीने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. त्यांनी एकूण ३२८ गुणांची नोंद केली. चीन (३३५ गुण) व ऑस्ट्रेलिया (३३१ गुण) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले.

भारताच्या सॅम जॉर्जला ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सहावे स्थान मिळाले. त्याने पात्रता फेरीत ११४० गुणांची नोंद केली होती. अंतिम फेरीत त्याने ४०२.५ गुण मिळवले. भारताच्या हर्षित बिंजवा, सरताजसिंग तिवाना व मिथिलेश बाबू यांनी अनुक्रमे नववे, १२वे व १३वे स्थान मिळवले. चीनच्या झांग चांगहोंगने या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. फिनलंडच्या सेबॅस्टियन लँगस्ट्रॉम व हंगेरीचा झालन पेल्केर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले.