भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट सामने खेळवले जात नाहीयेत. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतावादी हल्ल्याचं कारण देत भारताने पाकसोबत खेळण्यास नकार दिला आहे. आयसीसीच्या स्पर्धा वगळता भारत-पाक क्रिकेटच्या मैदानात समोरासमोर येत नाहीत. सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा यांनीही या प्रस्तावाला आपला पाठिंबा दर्शवला होता. भारतीय खेळाडूंनी मात्र भारत-पाक मालिका सध्याच्या घडीला शक्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. यानंतर माजी पाक कर्णधार वकार युनूसनेही भारत-पाक मालिका व्हायला हवी असं मत व्यक्त केलं आहे.

“जर तुम्ही दोन्ही देशातील सामान्य नागरिकांना विचाराल तर जवळपास ९५ टक्के जनता भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळवा या मताचे असतील. इम्रान-कपिल सिरीज, Independence सिरीज…तुम्हाला जे नाव द्यायचंय ते नाव द्या. पण सध्याच्या घडीला भारत-पाक मालिका खेळवली गेली तर त्याला नक्कीच चांहला प्रतिसाद मिळेल. दोन्ही देशातील चाहत्यांसाठी भारत-पाक संघामध्ये मालिका खेळवलं जाणं गरजेचं आहे. पुढील काही वर्षांमध्ये भारत-पाक मालिका खेळतील असा मला विश्वास आहे.” एका Chat Show मध्ये वकार युनूसने आपलं मत मांडलं.

सध्या करोनामुळे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. सामने रद्द होत असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसी पुन्हा सामने सुरु करता येतील का याचा विचार करत आहे. तोपर्यंत क्रिकेट प्रेमींना आपले आवडते खेळाडू परत मैदानात कधी उतरतात याची वाट पहावी लागणार आहे.