विदर्भाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सौराष्ट्रावर 78 धावांनी मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. सलग दुसऱ्या हंगामात विजेतेपद पटकावून विदर्भाने आपलं पहिलं विजेतेपद हे नशिबाने मिळालेलं नसल्याचं सिद्ध केलं. विदर्भाच्या विजयात मुळचा मुंबईकर असलेल्या वासिम जाफरचा मोठा वाटा आहे. गेले दोन हंगाम वासिम जाफर विदर्भाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ म्हणून काम करतोय. आज मिळवलेल्या विजेतेपदानंतर वासिम जाफरने आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

अवश्य वाचा – बाप्पा, पोट्टे जिंकले ना ! विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता

पहिल्या हंगामात विदर्भाने दिल्लीवर मात केली होती. तर दुसऱ्या हंगामात सौराष्ट्रावर मात करुन मिळवलेल्या विजयासह वासिम जाफर 10 रणजी विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे.

या यादीमध्ये अशोक मंकड हे 12 रणजी विजेतेपदांसह पहिल्या तर अजित वाडेकर 11 विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वासिम जाफरने 10 विजेतेपद मिळवत मनोहर हर्डीकर आणि दिलीप सरदेसाई या खेळाडूंशी बरोबरी केली आहे. या विजेतेपदानंतर विदर्भासमोर आता इराणी चषकाचं आव्हान असणार आहे. मागच्या हंगामात विदर्भाने रणजी करंडकासह इराणी करंडक जिंकण्याची किमया साधली होती.

अवश्य वाचा – रणजी क्रिकेटच्या चाणाक्याचा विजेतेपदांचा षटकार