नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याच्या प्रस्तावाला वेस्ट इंडिज क्रिकेट असोसिएशनने संमती दर्शवली आहे. त्यामुळे महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील दोनशेवी कसोटी भारतीय क्रिकेटर सिकांच्या साक्षीने होणार आहे.
‘‘वेस्ट इंडिजचा संघ नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याच्या प्रस्तावाला बुधवारी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने अनुकूलता प्रकट केली आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नोव्हेंबरमध्ये रिक्त असलेल्या तारखांचा उपयोग करून या मालिकेचे प्रयोजन केले आहे,’’ असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने पत्रकात म्हटले
आहे.
बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीने रविवारी झालेल्या बैठकीत वेस्ट इंडिज दौऱ्याचा प्रस्ताव तयार केला होता. यानंतर डिसेंबर महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.
सचिनच्या खात्यावर सध्या १९८ कसोटी सामने जमा असून, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी ही त्याची दोनशेवी कसोटी असेल. ‘‘दोन्ही मंडळांच्या अंतिम करारानंतर भारत दौऱ्याचा पूर्ण कार्यक्रम घोषित करण्यात येईल,’’ असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.

लॉरगेटने माफी मागितल्यास बरे होईल – दालमिया
कोलकाता : दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी हारून लॉरगेट यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) माफी मागितल्यास दोन मंडळांमधील मतभेद दूर होऊ शकतील, अशी सूचना बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी केली आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी असताना लॉरगेट आणि बीसीसीआय यांच्यात बऱ्याच मुद्यांवर वाद झाले होते. या पाश्र्वभूमीवर लॉरगेट दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी झाल्यानंतर बीसीसीआयचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील रस कमी झाला आहे.
‘‘लॉरगेट हे अतिशय चांगले व्यक्ती आहेत. परंतु त्यांनी माफी प्रदर्शित केल्यास अतिशय बरे होईल,’’ असे दालमिया म्हणाले.