भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील वादावर अखेर कॅरेबियन दौऱ्यावरील मालिकेचा तोडगा निघाला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि त्यांच्या खेळाडूंच्या संघटनांमधील वादामुळे २०१४ साली त्यांना भारतातील दौरा रद्द करावा लागला होता. त्याची भरपाई म्हणून भारतीय संघ जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंच्या संघटनांमधील वादामुळे त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताचा दौरा रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारताने श्रीलंकेला मायदेशात एकदिवसीय मालिका खेळवण्यासाठी आमंत्रित केले होते. या साऱ्या प्रकाराबद्दल वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट मंडळाची (बीसीसीआय) माफी मागितली आहे. त्याचबरोबर ही मालिका पुन्हा खेळवण्यात येणार असल्याची हमी दिली आहे.
हा दौरा रद्द झाल्यावर त्याची नुकसानभरपाई म्हणून वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने चार कोटी २० लाख अमेरिकन डॉलर्स द्यावेत, असे यापूर्वी बीसीसीआयने म्हटले होते. पण वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने हा दौरा कॅरेबियन बेटांवर खेळवण्यात यावा, असा प्रस्ताव वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने ठेवला आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष जेव्ह कॅमेरॉन आणि बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली आहे. त्यानुसार या दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवण्यात येणार असल्याचे मान्य करण्यात आले आहे. परंतु वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि त्यांच्या खेळाडूंच्या संघटनांचे एकमत झाल्यास हा दौरा यशस्वी होऊ शकणार आहे. त्यामुळेच बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. पण खेळाडूंची संघटना या दौऱ्यासाठी मान्यता देईल, अशी हमी कॅमेरॉन यांनी दिली असल्याचे समजते.