२५ जून १९८३ हा भारतीय क्रिकेटमधील एक अजरामर सुवर्णक्षण. इंग्लंडच्या लॉर्ड्सवर कपिल देवने साऱ्या जगाला अचंबित करीत विश्वचषक उंचावला. त्या क्षणापासून समस्त भारतवासीयांनी आपले तन-मन-धन सारे अर्पून क्रिकेटवर निस्सीम प्रेम करायला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक चढउतार आले. पण क्रिकेटविषयीचे प्रेम जराही कमी झाले नाही. २०११मध्ये भारतीय संघाने आणखी एक करिष्मा करून दाखविला. ज्या महेंद्रसिंग धोनीने २००७मध्ये भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून दिला होता, त्या धोनीने भारताला एकदिवसीय क्रिकेटच्या जगज्जेतेपदाची अनोखी भेट दिली. गेली २३ वष्रे क्रिकेटच्या रणांगणावर विक्रमादित्याप्रमाणे वावरणाऱ्या सचिन तेंडुलकरला आपण हा विश्वचषक समर्पित केला. त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये मर्दुमकी गाजवून भारतीय संघ इंग्लिश भूमीवर गेला. या भूमीवर लॉर्ड्सवरील पहिल्याच कसोटीच्या पहिल्याच दिवशी झहीर खानने दुखापतीची साडेसाती लावून घेतली. मग इंग्लंड दौरा संपेपर्यंत असंख्य क्रिकेटपटू दुखापतीमुळे मायदेशात परतले. इंग्लिश भूमीवर भारताची पाटी कोरी राहिली. कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान इंग्लंडने हिसकावून घेतले. वर्षभरानंतर तोच इंग्लिश संघ जेव्हा भारतात आला, तेव्हा महेंद्रसिंग धोनीची सेना बदला घेण्याची भाषा बोलत होती. पण जे काही घडले आहे, त्यावर कुणाचाही अद्याप विश्वास बसत नाही. इंग्लंडचा संघ २-१ असा मालिका विजय जल्लोषात साजरा करून आता मोठय़ा उत्साहात वावरत आहे.
फिरकीच्या बळावर भारतीय भूमीवर कोणत्याही संघाला लोळवता येते, हा अतिआत्मविश्वास भारताला नडला. घरच्या मैदानावर वर्षभरात वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडच्या दुबळ्या संघांना हरवून मालिका जिंकल्यामुळे धोनीने इंग्लिश आव्हानाचे गांभीर्य लक्षात घेतले नव्हते. प्रत्येक कसोटी निकाली लागावी आणि आपल्यासाठी ती अनुकूल ठरावी म्हणून धोनीने पहिल्या कसोटीपासूनच फिरकीला साजेशा खेळपट्टीचा हट्ट केला. हा हट्ट मुंबईच्या वानखेडेवर पुरविण्यात आला. पण भारताच्या फिरकी त्रिकुटाला जे जमले नाही, ते माँटी पनेसार आणि ग्रॅमी स्वानने करून दाखवले. त्यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबाबतचा वाद आणि क्युरेटर प्रबिर मुखर्जी यांचे मनधरणी नाटय़ चांगलेच रंगले. नेमके हेच दोन कसोटी सामने हरल्यामुळे भारताला मालिका हरण्याची नामुष्की पत्करावी लागली. मालिका गमावल्यानंतर आता धोनीचे कर्णधारपद, सचिन तेंडुलकरचे स्थान, वेगवान गोलंदाज झहीर खानची आवश्यकता, वीरेंद्र सेहवागचा फॉर्म, फिरकीची भारतात प्रभुत्व न दाखवणारी शान असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या साऱ्याच प्रांतांमध्ये आपण अपयशी ठरलो आहोत.
अहमदाबादच्या पहिल्या कसोटीत द्विशतक साजरे करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने या मालिकेत एकूण सर्वाधिक ४३८ धावा काढल्या आहेत. पण पुजारानंतर दुसऱ्या स्थानावर आहे तो ऑफ-स्पिनर आर. अश्विन. अश्विनच्या झुंजार फलंदाजीचे कौतुक करायलाच हवे, पण त्याच्याकडून आपल्याला अधिक समर्थ गोलंदाजीची अपेक्षा आहे. अश्विनच्या गोलंदाजीची धार मैदानावर जाणवलीच नाही. त्या तुलनेत प्रग्यान ओझाने चार कसोटी सामन्यांत २० बळी घेतले. पण भारतीय फिरकीची दहशत अहमदाबाद कसोटीनंतर इंग्लिश फलंदाजांवर कधीच दिसली नाही. पनेसारचे वेगाने वळणारे चेंडू खेळताना वानखेडेवर भारतीय फलंदाजांची उडालेली त्रेधातिरपीट पाहण्याजोगी होती. उमेश यादवने पहिल्या कसोटीत टिच्चून गोलंदाजी केली. पण नंतर तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. भारताच्या गोलंदाजीचा कणा मानल्या जाणाऱ्या झहीर खानच्या गोलंदाजीत भेदकता हरवल्याचेच आढळून आले. तीन कसोटी सामन्यांत त्याच्या खात्यावर ४ बळी जमा होते. ईडन गार्डन्सवर जिथे जेम्स अँडरसन चांगले रिव्हर्स स्विंग करीत होता, तिथेही झहीरला आपला प्रभाव पाडता आला नाही. अखेर निवड समितीने नागपूर कसोटीसाठी त्याला वगळण्याचा गंभीर निर्णय घेतला. पण हरभजन सिंगला मात्र फार कमी संधी दिल्याचे प्रत्ययास येते. उंच देहयष्टीच्या इशांत शर्माला अद्याप आपल्या गोलंदाजीत ती उंची गाठता आलेली नाही. जामठाच्या अखेरच्या कसोटीत इशांतच्या साथीला अशोक दिंडा किंवा परविंदर अवाना यापैकी एकाला संधी देता आली असती. पण अखेरच्या कसोटीतही फिरकीबाबतचा आपला अतिआत्मविश्वास कायम होता. त्यामुळे चार फिरकी गोलंदाजांच्या ताफ्यासहित आपण आक्रमण केले.
सचिन तेंडुलकरने या मालिकेत १८.६६च्या सरासरीने फक्त ११२ धावा केल्या. कोलकात्याचे अर्धशतक वगळल्यास सचिनकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता निश्चितच झालेली नाही. पण फक्त सचिनने निवृत्ती पत्करावी, त्याचे वय झाले आहे, हा कित्ता गिरविणाऱ्या माजी क्रिकेटपटू आणि प्रसारमाध्यमांकडून वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि कप्तान धोनी यांच्या फॉर्मकडे मात्र दुर्लक्ष होते आहे. या मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजीचा नजारा यापैकी कुणीही पेश केला नाही. एखाददुसऱ्या चांगल्या खेळीमुळे ते तगून आहेत. विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्याकडूनही नेमके तेच घडले. रणजीमध्ये बेफाम धावा काढणाऱ्या रवींद्र जडेजाच्या वाटय़ाला आलेल्या एकमेव डावात फक्त १२ धावाच करता आल्या. जडेजाला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची अजून संधी द्यायला हवी. त्याच्यावर शिक्का मारण्याची घाई करू नये. स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या सेहवागने अनेक महत्त्वपूर्ण झेल सोडले. पाठीच्या दुखापतीमुळे पुरेसे वाकता न येणाऱ्या सेहवागला कसोटी क्रिकेटमधील या महत्त्वाच्या जागेवर क्षेत्ररक्षणासाठी यापुढे उभे करावे का, हा प्रश्नही निकालात काढावा लागणार आहे. याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्ये कर्तृत्व दाखविणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांना संधीच मिळाली नाही.
इंग्लंड संघाविरुद्धच्या अपयशातून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आता भारतापुढे कसोटी क्रिकेटमधील आगामी आव्हान आहे ते ऑस्ट्रेलियाचे. तत्पूर्वी कोणते महत्त्वाचे बदल, संक्रमण घडतेय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण भारतीय क्रिकेट रसिकांइतकेच बीसीसीआय आणि निवड समितीनेही या घटनेचे गांभीर्य कृतीमध्ये दाखविण्याची गरज आहे.