अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाला पोलीस कस्टडीत असताना आपले प्राण गमवावे लागले. जॉर्जच्या अखेरच्या क्षणातले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जगभरात या घटनेविरोधात संतापाची लाट उसळली होती. अमेरिकेत लाखो कृष्णवर्णीय नागरिक रस्त्यावर उतरले. अनेक खेळाडूंनीही या घटनेविरोधात आपली नाराजी व्यक्त केली. विंडीजच्या ख्रिस गेल, डॅरेन सॅमी या खेळाडूंनी सोशल मीडियावर व्यक्त होत आपल्यालाही वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचं सांगितलं. भारतामध्येही अनेकदा असे प्रकार समोर येतात. भारतीय संघाचा माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने या सर्व प्रकारावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

“शाळा, कॉलेज किंवा कोणतंही क्षेत्र घ्या एखाद्या व्यक्तीच्या कमजोर गोष्टींची टिंगल करण्याची सवय प्रत्येकाला असते. प्रत्येक ठिकाणी या व्यक्ती टार्गेट शोधत असतात. जी लोकं त्यांच्या जाळ्यात अगदी सहज अडकतात मग त्यांना वारंवार त्यांच्या रंगावरुन किंवा इतर गोष्टींवरुन टार्गेट केलं जातं. सध्या करोना काळात आपण किती हतबल आहोत याची सर्वांना जाणीव झाली आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वच्छतेचे नियम पाळण्याचा प्रयत्न करतोय. पण मनातल्या विषाणूसाठी कोणता मास्क वापरायचा??” बालाजी क्रीडा समालोचक अरुण वेणुगोपाळ यांच्या कार्यक्रमात बोलत होता.

आपल्यालाही शाळेत असताना अशाच कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागल्याचं बालाजीने यावेळी सांगितलं. “मी शाळेत असताना सातवीत नापास झालो. मला विचाराल तर त्या वयात एकाच वर्गात पुन्हा तेच शिक्षण घेणं ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यावरही त्यावेळा प्रचंड दबाव होता, मी माझ्या पालकांच्या इच्छा पूर्ण करु शकलो नाही याचं मला सारखं वाईट वाटायचं. त्या प्रसंगात मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो. सुदैवाने माझ्या पालकांनी परिस्थिती समजून घेत मला आधार दिला. पण अनेक मुलं अशा परिस्थितीला तोंड देऊ शकत नाहीत आणि मग ते आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. माझ्या पालकांनी त्यावेळी समजूतदारपणा दाखवला म्हणून मी त्यामधून सावरलो. कोणत्याही निकषावर माणसांमध्ये भेदभाव करणं हे चुकीचं असल्याचं बालाजी म्हणाला.

आजही त्या घटनेचा ओरखडा माझ्या मनावर कायम आहे. त्यावेळी मला खूप कमी मार्क मिळाले होते, माझ्या आई-बाबांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. आज २५-२६ वर्षानंतरही ती गोष्ट आठवली की मला वाईट वाटतं. पण यामधून मी वेळेत सावरलो याचा मला आनंद असल्याचं बालाजीने सांगितलं.