टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकदरम्यान करोनाचा धोका अपरिहार्य आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संख्येवर ऑलिम्पिकचे यशापयश अवलंबून नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी स्पष्ट केले.

‘‘करोनाची लागण झालेल्यांची कशी काळजी घेतली जाते, हे सर्वात महत्त्वाचे आहे. करोनाची प्रकरणे समोर आणणे, त्यांचे विलगीकरण आणि त्यांची लवकरात लवकर काळजी घेणे, जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव खंडित केला जाईल, यावर ऑलिम्पिकचे यश अवलंबून आहे. आयुष्यात कुठे ना, कुठे तरी धोका पत्करावा लागतोच. पण ऑलिम्पिकचे आयोजन करून जपान संपूर्ण जगाला या कठीण काळातही धीर देत आहे. करोना हा कसोटीचा काळ असून संपूर्ण जग त्याचा सामना करत आहे,’’ असे टेड्रोस यांनी सांगितले.

पोलंडच्या सहा खेळाडूंची मायदेशी रवानगी

’ पोलंडच्या सहा जलतरणपटूंना टोक्योत दाखल झाल्यानंतर लगेचच मायदेशी पाठवण्यात आल्यामुळे त्यांचे ऑलिम्पिक सहभागाचे स्वप्न भंगले आहे. पोलंड जलतरण महासंघाने पात्रतेच्या प्रक्रियेत मर्यादेपेक्षा अनेक अर्ज भरले होते. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याची चुकीची माहिती महासंघाकडून जलतरणपटूंना मिळाल्यानंतर ते २३ जणांच्या पथकासह टोक्योत दाखल झाले होते. पण नोंदणीतील चुकीमुळे त्यांची मायदेशी रवानगी करण्यात आली आहे.

तीन खेळाडूंची करोनामुळे माघार

’ चिलीचा तायक्वांडोपटू फर्नांडा अ‍ॅग्युएरे, नेदरलँड्सची स्केटबोर्ड खेळाडू कँडी जेकब्स आणि चेक प्रजासत्ताकचा टेबल टेनिसपटू पाव्हेल सिरूसेच यांनी करोनाची लागण झाल्याने बुधवारी टोक्यो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. टोक्यो विमानतळावर दाखल झाल्यानंतर फर्नांडाचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला. जेकब्स आणि पाव्हेलला ऑलिम्पिक नगरीत करोनाची लागण झाली.  फर्नांडा उझबेकिस्तान येथून नकारात्मक चाचणी अहवाल घेऊन दाखल झाला होता.