ICC World Test Championship कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अ‍ॅशेस मालिकेपासून सुरूवात झाली. पुढील सुमारे २ वर्षे ही अजिंक्यपद स्पर्धा सुरू राहणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिका आता शेवटच्या टप्प्यात आहे. ५ पैकी २ सामन्यांत विजय मिळवून ऑस्ट्रेलिया मालिकेत आघाडीवर आहे. तसेच भारतानेही नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर २ सामने जिंकले. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक २ सामने जिंकणारे ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोनच संघ आहेत. पण असे असले तरीही या दोन संघांचे गुण वेगळे असून क्रमवारीतील स्थानदेखील वेगवेगळे आहे. हे कसे काय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेला दिसतो आहे. त्यामागे एक महत्वाचे कारण आहे.

अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्यानंतर हा गुणतक्ता अपडेट केला आहे

 

ICC World Test Championship या स्पर्धेत नियमानुसार एका मालिकेसाठी १२० गुण ठरवण्यात आले आहेत. भारताची विंडिजविरूद्धची कसोटी मालिका ही २ सामन्यांची होती. त्यामुळे या मालिकेत २ सामना जिंकणाऱ्या संघाला म्हणजेच भारताला १२० गुण देण्यात आले. जर सामना अनिर्णित राहिला असता, तर दोनही संघांना २०-२० गुण वाटून देण्यात आले असते. पण भारताने दोनही सामने जिंकले आणि १२० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

अ‍ॅशेस मालिका मात्र ५ सामन्यांची आहे. त्यामुळे या मालिकेतील गुणपद्धती भारत-विंडिज मालिकेपेक्षा वेगळी आहे. या मालिकेत एका सामन्यातील विजयानंतर विजयी संघाला २४ गुण देण्यात येत आहेत. तर अनिर्णित सामन्याचे ८ गुण दिले जात आहेत. त्यामुळे २ सामन्यातील विजय आणि १ अनिर्णित सामना यामुळे ऑस्ट्रेलियाचे ५६ गुण आहेत.