‘स्पॉट-फिक्सिंग’ याचप्रमाणे अन्य वादविवादांमुळे आयपीएल कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला चांगलेच निराश झाले आहेत. या प्रकरणांनी त्रस्त झालेल्या शुक्ला यांनी पुन्हा आयपीएलचे प्रमुखपद स्वीकारण्यासाठी आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ एक वर्षांचा आहे. या कार्यकाळाचे नूतनीकरण होऊ शकते. मात्र सलग तिसऱ्या वर्षी हा काटेरी मुकुट स्वीकारण्यासाठी तयार आपण नसल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
‘‘मी बीसीसीआयमधील कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही. आयपीएल सामन्यांचे शिस्तबद्ध आयोजन करणे, हे माझे काम होते आणि ते मी केले. वादविवाद होऊनही सर्व सामन्यांना क्रिकेटरसिकांची चांगली गर्दी होती. कार्यकारिणी समितीचे अध्यक्षपद मी एक आव्हान म्हणून स्वीकारले. सर्वोत्तम क्षमता उपयोगात आणत काम करण्याचा प्रयत्न मी केला,’’ असे शुक्ला म्हणाले.