21 January 2019

News Flash

राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणं हे आमचं ध्येय – मनप्रीत सिंह

१७ तारखेपासून भारतीय संघ चौरंगी मालिका खेळणार

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह (संग्रहीत छायाचित्र)

२०१८ वर्षात अवघ्या काही दिवसांमध्ये भारतीय हॉकीसंघाची खरी परीक्षा सुरु होणार आहे. मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकीचा संघ न्यूझीलंडमध्ये चौरंगी मालिका खेळणार आहे. यात यजमान न्यूझीलंडसह भारत, जपान आणि बेल्जियमशी दोन हात करणार आहे. मात्र कर्णधार मनप्रीतने आतापासूनच आपल्या संघासाठी ध्येय नक्की करुन टाकलं आहे.

अवश्य वाचा – २०१८ वर्षात भारतीय हॉकी संघाचं नवं रुप समोर येईल – पी. आर. श्रीजेश

“चौरंगी मालिकेतून आम्हाला आत्मविश्वास मिळेल यात काहीच वाद नाही. वर्षाच्या सुरुवातीला सर्वोत्तम संघांविरुद्ध तुम्हाला खेळायला मिळणं ही चांगली गोष्ट आहे. आगामी विश्वचषकात बेल्जियमचा संघ आमच्या गटात आहे. मात्र या मालिकेतून आत्मविश्वास मिळवत राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मनप्रीत बोलत होता.

अवश्य वाचा – न्यूझीलंडमधील चौरंगी मालिकेसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, पी. आर. श्रीजेशचं पुनरागमन

२०१७ साली वर्ल्ड हॉकीलीग फायनल स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि जर्मनी यासारख्या बड्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात चांगली कामगिरी केली. या लढतींमधून भारतीय खेळाडूंच्या आत्मविश्वासात भर पडली आहे. “याआधी मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आमचे खेळाडू थोडेसे दबावाखाली असायचे, मात्र आता आम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आत्मविश्वासाने सामोरं जाऊ शकतो.” त्यामुळे चौरंगी मालिकेत चांगली कामगिरी करुन राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मनप्रीतने पुन्हा एकदा बोलून दाखवलं.

First Published on January 12, 2018 7:13 pm

Web Title: winning gold medal in cwg a realistic goal says indian hockey captain manpreet singh