पुण्याच्या महिला संघाने नुकत्याच झालेल्या हीरकमहोत्सवी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सलग सातव्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला. या विजयात दीपस्तंभासारखी उभी राहिली ती पुण्याची आंतरराष्ट्रीय ख्यातीची खेळाडू दीपिका जोसेफ. तिने स्वत: अष्टपैलू खेळ तर केलाच, परंतु इतरांकडूनही चांगला खेळ करून घेतला. तिच्या या खेळाचा व नावाचा एवढा धसका इतर जिल्ह्य़ांच्या संघांनी घेतला की पुण्याला या स्पर्धेत कडवा प्रतिकार असा झालाच नाही. पुण्याने २००६मध्ये चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत मुंबई शहराची हॅट्ट्रिक हुकवत जेतेपद पटकावले. २००८मध्ये स्पर्धा झालीच नव्हती, परंतु या सातही विजयांत दीपिका तडफेने खेळली. प्रत्येक वेळी तिचे सहकारी बदलले, परंतु दीपिकाचा दरारा मात्र कायम तसाच राहिला. दीपिकाच हा दरारा कायम राखण्यात तिच्या सहकाऱ्यांचाही तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच दीपिका एवढी मनमोकळी खेळू शकली. पुण्याच्या या विजयाचे श्रेय एकटय़ा दीपिकाला दिले तर ते अन्यायाचे ठरेल. कारण या स्पर्धेत स्नेहल शिंदेनेदेखील चढाईत कर्तृत्व दाखवत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पुण्याचे क्षेत्ररक्षणही भक्कम झाले. दोन्ही कोपरारक्षक रेणुका तापकिरे व सायली केरीपाळे यांनी बचावाची बाजू भक्कम सांभाळली. स्नेहल साळुंखे, अभिलाषा म्हात्रे या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही त्यांच्या बचावातून गडी टिपणे कठीण जात होते. पुण्याला किशोरी व कुमारी गटांच्या संघाकडून खेळाडूंचा स्रोत उपलब्ध होत गेला. त्यामुळे त्यांना खेळाडूंची कमतरता भासली नाही. गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहता कुमारी गटात पुण्याने तीनदा विजेतेपद व पाचदा उपविजेतेपद मिळविले, तर किशोरी गटात चार वेळा विजेतेपद व एक वेळा उपविजेतेपद मिळविले. खेळाडूंच्या या ओघामुळे पुण्याला पुढील तीन-चार वर्षे तरी या विजेतेपदापासून कोणी रोखू शकत नाही, असे दिसत आहे.
पूर्वी या स्पर्धेवर मुंबई-पुण्याचे वर्चस्व होते. सध्या मुंबई शहराची अवस्था अतिशय बिकट होती. स्नेहल साळुंखे वगळली तर अन्य खेळाडू कोणत्या दर्जाचे होते? भिवंडीच्या स्पर्धेत स्नेहलला मुंबईकडून डावलण्याचा प्रयत्न झाला. त्याच स्नेहलने मुंबईला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिली. आज मुंबईत मैदाने उपलब्ध नाहीत. पालक मुलींना खेळायला पाठवत नाही. त्यामुळे खेळाडू उपलब्ध होत नाहीत. त्यातच योग्य वेळी योग्य खेळाडूला संधी मिळाली नाही तर तो खेळाडू नाराज होतो. या सर्व गोष्टींचा फटका मुंबईला बसत आहे. उपनगरचीही अभिलाषा म्हात्रे एकाकी लढली. संघात अश्विनी महाडिक, अश्विनी शेवाळे, कोमल देवकरसारख्या चढाईच्या खेळाडूंचा भरणा असूनदेखील त्यांच्यावर विश्वास दाखविला गेला नाही. पुण्याच्या भक्कम क्षेत्ररक्षणाचा धसका इतर जिल्हा संघांनी किती घेतला होता, हे यावरून सिद्ध होते. १९७३पासून जिल्ह्य़ाच्या महिला कबड्डीला सुरुवात झाली. या कालावधीत १८ वेळा पुण्याने विजेतेपद पटकाविले आहे.
पुरुष विभागात सांगलीने सलग दुसऱ्यांदा राज्य अजिंक्यपदावर नाव कोरत आपले वर्चस्व दाखवले. गतवर्षी सांगलीत ही स्पर्धा झाली होती आणि पंचांच्या निर्णयामुळे त्यांच्या विजयाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. यंदा त्यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळविला. सांगलीच्या विजयात नितीन मदनेच्या कल्पक खेळाचा सिंहाचा वाटा आहे. कित्येक वर्षांनी अंतिम सामन्यात चित्तथरारक चुरस प्रेक्षकांना पाहावयास मिळाली. नितीन मदनेने संघाची गरज ओळखून खेळ केला. कसे खेळावे हे मदनेने दाखवून दिले, तर कसे खेळू नये हे रिशांक देवाडिगाने दाखवून दिले.
आज शहरी भागातील कबड्डी संपत आल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात कबड्डीने जोर धरला आहे. मुंबई, ठाण्याची अवस्थाही काही वेगळी नव्हती. ठाण्याचे दोन्ही संघ अतिउत्साहामुळे पराभूत झाले. ठाण्याचा पुरुष संघ अंतिम फेरी गाठेल असे वाटले होते. परंतु संयमाने खेळ करीत उपनगरने त्यांच्यावर मात केली. ठाण्याच्या मुलींचीही तीच गत झाली. शेवटच्या काही मिनिटांत त्यांनी बरोबरी केली. परंतु स्नेहलने आपल्या अनुभवाच्या बळावर त्यांना पराभूत केले. पुण्याचा पुरुष संघ उत्तम होता. परंतु हुकमी चढाईचा खेळाडू नसल्यामुळे ते कमी पडले. त्यातच नेवाळे फारसा यशस्वी ठरत नसल्यामुळे ते कमी पडले. सांगलीचा संघ हा अतिशय समतोल व तरुणाईने भरलेला होता. कृष्णा माळी, सचिन शिंगाडे यांनी बचावाची बाजू भक्कमपणे सांभाळली. पुढील वर्षी हॅट्ट्रिकची त्यांना संधी आहे. पुरुष विभागात अंदाज व्यक्त करणे कठीण आहे, तरीदेखील २-३ वर्षे सांगली विजेतेपदाचे दावेदार राहतील असे चित्र दिसत आहे.
महिला गटातील पुण्याचे आणि पुरुषांमधील सांगलीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अन्य जिल्ह्य़ांना आता कंबर कसावी लागणार आहे. नव्या दमाचे खेळाडू तयार करून त्यांना अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे. आत्मपरीक्षणाच्या निदानरेषेवर असणाऱ्या या जिल्ह्य़ाच्या संघांना आता याबाबत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.