दुबळ्या अफगाणिस्तानावर यजमान इंग्लंडने विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात १५० धावांनी एकतर्फी विजय मिळवला. कर्णधार मॉर्गनच्या झंझावाती १४८ धावांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानपुढे ३९८ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. पण अफगाणिस्तानला केवळ ८ बाद २४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडने ५ सामन्यात ८ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानी धडक मारली. तर अफगाणिस्तानला ५ सामन्यात अद्यापही गुणांचे खाते उघडता आलेले नाही.

या सामन्यात इंग्लंडच्या संघाने दमदार फलंदाजी करत ३९७ धावा कुटल्या. या सह इंग्लंडच्या फलंदाजांनी एक दणदणीत विक्रम केला. इंग्लंडच्या डावात एकूण २५ षटकार मारले गेले. एका डावात मारलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. डावात मॉर्गनने १७, मोईन अलीने ४, बेअरस्टोने ३ तर जो रूटने १ षटकार खेचला. या आधी विंडीजविरुद्ध २७ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात इंग्लंडने २४ षटकार खेचले होते. त्यावेळी इंग्लंडने ४१८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मंगळवारच्या सामन्यात इंग्लंडने त्यांच्याच विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला.

सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ४४ धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा बेअरस्टो शतकाला मात्र मुकला. ९० धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. जो रुटने आपली खेळी चालू ठेवली आणि कर्णधार मॉर्गनच्या साथीने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.

रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने खेळाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. त्याने तुफानी फटकेबाजी करत केवळ ५७ चेंडूत १०० धावांचा पल्ला गाठला. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल १७ षटकार आणि ४ चौकार यांच्या मदतीने ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळताना रूट आणि मॉर्गन दोघेही एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर मोईन अलीने ४ षटकार आणि १ चौकार खेचत ९ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या आणि संघाला ५० षटकात ६ बाद ३९७ धावांची मजल मारून दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ ८ बाद २४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.