पाकिस्तानविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी फाफ डू प्लेसीच्या नेतृत्वाखाली World XI चा संघ लाहोरमध्ये दाखल झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी पाहुण्या संघाचं लाहोर विमानतळावर जाऊन स्वागत केलं. झिम्बाब्वेचा अपवाद वगळता एकाही देशाने गेल्या ८ वर्षांमध्ये पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. श्रीलंकेच्या संघावर पाकिस्तानमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे आयसीसीनेही पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली होती. मात्र ८ वर्षांनंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर आयसीसीने या दौऱ्याला आपली मान्यता दिली आहे.

हाशिम आमला, जॉर्ज बेली, ग्रँड इलिओट, मॉर्ने मॉर्केल, थिसारा परेरा, पॉल कॉलिंगवूड, डॅरेन सॅमी यासारखे आजी-माजी खेळाडू पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार आहेत. दोन्ही संघाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय्यत तयारी केलेली आहे. दोन्ही संघांना पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना मिळणाऱ्या दर्जाची सुरक्षाव्यवस्था मिळणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार तब्बल १० हजार पोलिस कर्मचारी वर्ग या मालिकेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

अवश्य वाचा – एक दिवस सर्व देश पाकिस्तानचा दौरा करतील!

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनेही या दौऱ्याचं स्वागत करत, आयसीसीचे आभार मानले आहेत. मात्र बीबीसी उर्दुला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीने या संघात भारतीय खेळाडू असायला हवे होते, असं वक्तव्य केल आहे. भारतीय खेळाडूंचा समावेश केला असता, तर World XI संघ आणखी मजबूत वाटला असता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही आफ्रिदीने आपलं मत मांडलेलं आहे.

या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त केला आहे. त्यामुळे ही मालिका निर्विघ्नपणे पार पाडली जाते का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.