दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेला पहिला टी-20 विश्वचषक भारताला जिंकवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या युवराज सिंहने आज आपल्या वयाच्या 37 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सध्या युवराज भारतीय संघात खेळत नसला तरीही तो स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाबकडून रणजी सामन्यात खेळतो आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर मात करुन युवराज पुन्हा एखाद्या योद्ध्यासारखा मैदानात उभा राहिला आहे. आजच्या दिवशी युवराजने काही कॅन्सरग्रस्त मुलांचा खर्चही उचलला आहे. युवराजच्या अनेक सहकाऱ्यांनी आजच्या दिवशी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईकर रोहित शर्मानेही ट्विटरवरुन युवराजला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावर रोहितचे आभार मानाता युवराजने त्याला प्रेमळ ताकीदच दिली. युवराजने त्याचा व रोहित शर्माचा आयपीएलमधला एक पोटो पोस्ट करुन, पुन्हा 37 वर बाद झालास तर अशीच तुझी मान पकडेन असं म्हटलं आहे.

नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडलेल्या ओव्हल कसोटीत रोहित शर्माला संधी देण्यात आली होती. या सामन्यात रोहित शर्मा 37 धावांवर माघारी परतला होता. ज्या पद्धतीने रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात माघारी परतला, त्यावरुन सोशल मीडियावर त्याला टिकेचं धनी बनवण्यात आलं होतं. दरम्यान भारतीय संघात युवराज पुनरागमन करेल अशी शक्यता कमी असली तरीही आगामी आयपीएलमध्ये त्याला कोणता संघ आपल्या खात्यात सामावून घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.