भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी पंजाबच्या संभाव्या ३० सदस्यीय संघात युवराजचा समावेश करण्यात आला आहे. १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. युवराजशिवाय सुरेश रैना आणि श्रीसंतही मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. रैना उत्तर प्रदेश तर श्रीसंत केरळ संघात प्रतिनिधीत्व करणार आहेत.

२०११ च्या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या सिस्कर किंग युवराजनं जून २०१९ मध्ये सर्व प्रकराच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्कारली होती. पण पंजाब क्रिकेट संघटनेचे सचिव पुनीत बाली यांनी संपर्क साधल्यानंतर युवराज पंजाब संघाकडून खेळण्यास तयार झाला. युवराज सध्या मोहालीच्या मैदानात सराव करत आहे. मात्र, युवराजला पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयच्या अनुमतीची प्रतीक्षा आहे.

युवराजनं भारतासाठी ३०४ एकदिवसीय, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. २०१९ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर युवराजनं कॅनडा ग्लोबल टी-२० मध्ये सहभाग नोंदवला होता.