जोकोव्हिच, प्लिस्कोव्हाची विजयी सलामी

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा

एपी, पॅरिस

जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि ग्रीसचा स्टीफानोस त्सित्सिपास या दोन्ही उदयोन्मुख टेनिसपटूंनी बुधवारी दिमाखात फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. त्यापूर्वी, मंगळवारी मध्यरात्री सर्बियाचा अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीत विजयी सलामी नोंदवली.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सहाव्या मानांकित झ्वेरेव्हने रोमन सफिउल्लीनवर ७-६ (७-४), ६-३, ७-६ (७-१) असे सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. पाचव्या मानांकित त्सित्सिपासने स्पेनच्या प्रेडो मार्टिनेझला ६-३, ६-४, ६-३ अशी धूळ चारली. तिसऱ्या फेरीत झ्वेरेव्हचा लास्लो डेरेशी, तर त्सित्सिपासचा फेड्रिको डेल्बोनिसशी सामना होईल. जपानच्या केई निशिकोरीने पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत कॅरेन खाचानोव्हला ४-६, ६-२, २-६, ६-४, ६-४ असे पराभूत केले.

तत्पूर्वी, पहिल्या फेरीतील लढतीत जोकोव्हिचने टॅॅनिस सँडग्रेनला ६-२, ६-४, ६-२ अशी धूळ चारली, तर नवव्या मानांकित मॅटिओ बॅरेट्टिनीने टॅरो डॅनिएलवर ६-०, ६-४, ४-६, ६-४ असा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन आणि रशियाचा सातवा मानांकित आंद्रे रुब्लेव्ह यांना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

महिला एकेरीत ११व्या मानांकित प्लिस्कोव्हाने डोना व्हेनिकचा ७-५, ६-४ असा पराभव केला. २४व्या मानांकित कोरी गॉफने अलेक्झांड्रा क्रूनिकवर ७-६ (१३-११), ६-४ अशी मात करून दुसरी फेरी गाठली. चेक प्रजासत्ताकच्या २०व्या मानांकित मार्केटा वोंडोऊसोव्हा हिने फ्रान्सच्या हार्मोनी टॅन हिच्यावर ६-१, ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पायाच्या दुखापतीमुळे क्विटोव्हाची माघार

चेक प्रजासत्ताकची ११वी मानांकित टेनिसपटू पेत्रा क्विटोव्हाने पायाच्या दुखापतीमुळे फ्रेंच टेनिस स्पर्धेतून मध्यातच माघार घेतली. सोमवारी पहिल्या फेरीत ग्रीट मिनेनला पराभूत केल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी जाताना अचानक पडल्यामुळे क्विटोव्हाच्या घोटय़ाला दुखापत झाली. बुधवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होणे कठीण असल्यामुळे तिने अखेर मंगळवारी रात्री स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तिची प्रतिस्पर्धी एलिना व्हेसिनाला पुढे चाल देण्यात आली.