अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातील १९ वर्षीय खेळाडून झाकि अनवारीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. काबूलमधून उड्डाण करणाऱ्या अमेरिकन लष्कराच्या विमानाला लटकून देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न करताना घडलेल्या अपघातामध्ये अनवारीने प्राण गमावल्याचं अफगाणिस्तानमधील फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स विभागाच्या जनरल डारेक्टरेटने ही माहिती दिलीय.

फेसबुकवर अफगाणिस्तानमधील फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स विभागाच्या जनरल डारेक्टरेटने पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिलीय. “आम्हाला कवण्यास दु:ख होत आहे पण देशाच्या ज्युनियर फूटबॉल टीममधील सदस्य झाकि अनवारीचं एका अपघातामध्ये निधन झालं आहे. देश सोडण्याच्या प्रयत्न असणाऱ्या शेकडो तरुण मुलांमध्ये झाकिचा समावेश होता. तो अमेरिकन विमानाला लटकून जाताना पडला आणि त्याचा मृत्यू झाला,” असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोमवारपासून हजारो अफगाणिस्तान नागरिक काबूक विमानतळावर आहेत. तालिबानने काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर देश सोडण्यासाठी हे नागरिक धडपडत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये नागरिक काबूल विमानतळावर अमेरिकन लष्कराच्या सी -१७ विमानासमोर पळताना दिसत आहे. अशाच एका विमानाच्या चाकांना लटकून प्रवास करताना पडून झाकिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकन हवाई दलाने केलेल्या तपासणीमध्ये सी १७ विमानाच्या चाकांमध्येही मानवी अवशेष आढळून आलेत.

१९ वर्षीय झाकि अनवारी हा इस्तेकलाल हायस्कूलचा विद्यार्थी होता. अफगाणिस्तानमधील ही सर्वात नावालेल्या शाळांपैकी एक आहे. यापूर्वीचे अफगाणिस्तानमधील राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि अशरफ घनी यांच्या कार्यकाळामध्ये येथे खेळांना फार महत्व देण्यात आलं होतं. आता तालिबानची सत्ता आल्यानंतर देशातील क्रीडा प्रकारांना वाव मिळण्याची संधी धूसर आहे. मागील वेळेस १९९६ मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर पुरुषांचे संघ सर्वच खेळांमध्ये मागे पडले होते तर महिलांना खेळवण्यात बंदी घालण्यात आलेली.