जर्मनीचा २९ वर्षीय खेळाडू निको रोसबर्ग याने सुरेख कौशल्य दाखवीत ब्रिटिश ग्रां.प्रि मोटार शर्यतीत पोलपोझिशन मिळविली. त्याने शेवटच्या फेरीत स्थानिक खेळाडू लेविस हॅमिल्टन याला मागे टाकून हे स्थान घेतले. हॅमिल्टन हा सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. रोसबर्ग याने यंदा चौथ्यांदा पोलपोझिशन मिळविली आहे. येथे शनिवारी फेरारी व विल्यम्स या दोन्ही संघांच्या स्पर्धकांना शर्यतीतून बाद व्हावे लागले. सेबॅस्टीयन व्हेटेल याने मॅक्लेरेन संघाचा जेन्सन बटनला मागे टाकून रोसबर्गपाठोपाठ ही शर्यत पूर्ण केली. फोर्स इंडिया संघाच्या निको हुल्केनबर्ग याने चौथे स्थान घेतले. डॅनिश खेळाडू केविन मॅग्नसन याने पाचव्या क्रमांकाने ही शर्यत पार केली. फोर्स इंडियाचा खेळाडू सर्जिओ पेरेझ याला सातवे स्थान मिळाले.