आतापर्यंत स्पेनने सुवर्णकाळ अनुभवला. २००८ आणि २०१२च्या युरो चषक स्पर्धेचे जेतेपद आणि २०१०च्या विश्वचषकावर मोहोर उमटवणारा स्पेन हा जगातील पहिला संघ ठरला. पण या सुवर्णयुगाची लकाकी काही खेळाडूंच्या अस्तामुळे कमी होत गेली. स्पेनचा फिफा विश्वचषकासाठीचा संघ पूर्वीइतका मजबूत नसला तरी संघात गुणवत्ता अगदी ठासून भरलेली आहे. रॉबेटरे सोल्डाडो, अल्वारो नेग्रेडो, जीजस नवास आणि मिकू या नव्या दमाच्या खेळाडूंची भर पडली आहे. त्यांच्या जोडीला आंद्रेस इनियेस्टा, डेव्हिड सिल्वा आणि झावी हेर्नाडेझ हे अनुभवी खेळाडू आहेतच. चॅम्पियन्स लीग, युरोपियन चषक आणि विश्वचषक जिंकून देणारे अनुभवी प्रशिक्षक विन्सेन्ट डेल बॉस्के दिमतीला असल्यामुळे स्पेन या वेळीही ‘आम्हीच जगज्जेते’ या आविर्भावात विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘टिकी-टाका’ शैलीनुसार (सुरेख पासिंगसह चेंडू पुढे घेऊन जाण्याची पद्धत) खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि स्पॅनिश लीगवर वर्चस्व गाजवणाऱ्या झावी, हेर्नाडेझ, झाबी अलोन्सो आणि अन्य दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीमुळे स्पेन हा संघ कोणत्याही दिग्गज संघासाठी आव्हानच ठरणार आहे. २०१० पूर्वी स्पेनला विश्वचचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपलिकडे स्थान मिळवता आले नव्हते. फक्त १९५०च्या विश्वचषकात स्पेनने चौथ्या स्थानी झेप घेतली होती. २०१०च्या फिफा विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर आता स्पेन संघ सलग दुसऱ्या विश्वचषक विजयासाठी सज्ज झाला आहे. डेव्हिड सिल्वा आणि जीजस नवाससारखे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्मात असल्यामुळे २०१०च्या विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी डेल बॉस्के उत्सुक आहेत.
फर्नाडो टोरेस, अल्वारो नेग्रेडो, डेव्हिड व्हिला आणि रॉबेटरे सोल्डाडो या आघाडीवीरांप्रमाणेच दिएगो कोस्टाचा आक्रमक खेळ स्पेनसाठी फायदेशीर ठरणार आहे. अंतिम फेरीत नेदरलँड्सविरुद्ध एकमेव गोल करून स्पेनच्या विश्वचषक विजयाचा मानकरी ठरलेला आंद्रेस इनियेस्टा सध्या प्रत्येक सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. त्यामुळे चार वर्षांनंतरही त्याचा खेळ पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. आयकर कसिल्लास ही स्पेनसाठी भिंतच. संयमी आणि समतोल असलेल्या कसिल्लासने गोलरक्षकाची भूमिका चोख पार पाडत स्पेनच्या आतापर्यंतच्या यशात सिंहाचा वाटा उचलला आहे.
अपेक्षित कामगिरी
‘स्पॅनिश अर्माडा’ने गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय फुटबॉलवर अधिराज्य गाजवले आहे. पण २०१३च्या कॉन्फेडरेशन चषकाच्या अंतिम फेरीत स्पेनला ब्राझीलकडून पराभूत व्हावे लागले होते. ब-गटात स्पेन संघ अव्वल स्थान पटकावणार, यात कोणतीच शंका नाही. बाद फेरीत त्यांना ब्राझील आणि क्रोएशिया किंवा मेक्सिकोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ९० मिनिटांत त्यांची कामगिरी कशी होते, यावर त्यांची वाटचाल अवलंबून राहणार आहे. विश्वचषकाचे जेतेपद कायम राखण्यासाठी स्पेनला १०० टक्के सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
समन्वय आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती, हीच स्पेनची खरी ताकद ओखळली जाते. झावी, इनियेस्टा, फॅब्रेगस, प्रेडो, जॉर्डी अल्बा आणि बस्केट्स हे बार्सिलोनासाठी तर डेव्हिड सिल्वा, नवास, नेग्रेडो हे मँचेस्टर सिटीसाठी तसेच रामोस, अर्बेलोआ, कसिल्लास, असोन्सो हे रिअल माद्रिदसाठी वर्षभर एकत्र खेळतात. त्यामुळे एकमेकांचा खेळ समजून त्यानुसार डावपेच आखण्याचा समजूतदारपणा त्यांच्यात नक्कीच आहे. मधल्या फळीतही इतकी गुणवत्ता आहे की कधी-कधी डेल बॉस्के यांना आघाडीवीर मैदानात पाठवण्याची गरजही भासत नाही. प्रतिस्पध्र्याचे डावपेच हाणून पाडणारा गोलरक्षक आयकर कसिल्लास त्यांच्याकडे आहे. पासिंग करण्याच्या कौशल्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूही चक्रावून जातात. याच निराशेपोटी स्पेनच्या खेळाडूंना सहजपणे चेंडू गोलजाळ्यात धाडता येतो. बचावातील ढिसाळपणा स्पेनसाठी महाग ठरू शकतो. सर्जीओ रामोस हा आक्रमक खेळासाठी ओळखला जात असल्यामुळे त्याला केव्हाही लाल कार्ड मिळण्याची शक्यता आहे. गेरार्ड पिक सध्या दुखापतीतून सावरलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिएगो कोस्टाची गुणवत्ता अद्याप पारखलेली नाही.
* फिफा क्रमवारीतील स्थान : १
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : १४ वेळा (२०१४सह)
* जेतेपद : २०१०
* चौथे स्थान : १९५०
उपांत्यपूर्व फेरी : १९३४, १९८६, १९९४, २००२
संभाव्य संघ :
* गोलरक्षक : आयकर कसिल्लास, पेपे रेना. बचावफळी : जॉर्डी अल्बा, राऊल अल्बिओल, सर्जीओ रामोस, अप्झिलिक्युएटा, जुआनफ्रान, अर्बेलोआ.मधली फळी : झावी हेर्नाडेझ, आंद्रेस इनियेस्टा, झाबी अलोन्सो, सर्जीओ बस्केट्स, सेस्क फॅब्रेगस, डेव्हिड सिल्वा, जीजस नवास, सान्ती काझोर्ला, थिआगो अलाकांटरा, जावी मार्टिनेझ, कोके. आघाडीवीर : दिएगो कोस्टा, अल्वारो नेग्रेडो, प्रेडो रॉड्रिगेझ, रॉबेटरे सोल्डाडो, फर्नाडो टोरेस, डेव्हिड व्हिला, फर्नाडो लोरेन्टो.
* स्टार खेळाडू :आंद्रेस इनियेस्टा, डेव्हिड व्हिला, फर्नाडो टोरेस, आयकर कसिल्लास, सर्जीओ रामोस.
* प्रशिक्षक : विन्सेंट डेल बॉस्के
* व्यूहरचना : ४-३-३.