सूरत : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसपटूंनी महाराष्ट्राला दमदार सुरुवात करून दिली. महाराष्ट्राच्या पुरुष महिला संघांनी गटातील आपल्या दोन लढती जिंकून बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला.

पुरुषांच्या पहिल्या लढतीत महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाचे आव्हान ३-१ असे पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या लढतीत पुरुष संघाने पश्चिम बंगालचे तगडे आव्हान ३-० असे परतवून लावले. यामध्ये सनिल शेट्टीची कामगिरी निर्णायक राहिली. पहिल्या लढतीत त्याने एकेरीच्या आपल्या दोन्ही लढती जिंकल्या. पश्चिम बंगालविरुद्धही त्याने आपली लढत जिंकली. पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागलेल्या दिपीत पटेलने बंगालविरुद्ध अर्णव घोषचे आव्हान  ११-४, ११-५, ६-११, ११-१३, ११-४ असे पाच गेमच्या लढतीत परतवून लावले.

महिला संघाने आपल्या दोन्ही लढती एकतर्फी जिंकल्या. पहिल्या लढतीत गुजरात आणि नंतर तेलंगणाचा त्यांनी ३-० असा पराभव केला. महाराष्ट्राच्या दिया चितळे, स्वस्तिका घोष आणि रिथ रिशा या तीनही अनुभवी खेळाडूंनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या. यातही स्वस्तिका घोषची तेलंगणाविरुद्धची खेळी लक्षवेधी ठरली. राष्ट्रीय विजेती आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या अकुला श्रीजाला सहज पराभूत केले. स्वस्तिकाने अकुलाचा ११-७, ११-९,१२-१४,११-४ असा पराभव केला.