आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २८ ऑगस्ट रोजी भारत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची आत्तापासूनच जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांदरम्यानचा इतिहास या चर्चेला कारणीभूत आहे. बिघडलेल्या परराष्ट्रीय संबंधांमुळे दोन्ही देश द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळत नाहीत. त्यामुळे फक्त आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मान्यता असलेल्या स्पर्धांमध्येच दोन्ही देश समोरासमोर येतात. जेव्हा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असतो तेव्हा मैदानावर दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसते. आशिया चषकाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अशा अनेक वादग्रस्त घटना घडलेल्या आहेत.

१) गौतम गंभीर आणि कामरान अकमलची एकमेकांना शिवीगाळ

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज कामरान अकमल यांच्यात २०१० मध्ये झालेल्या आशिया चषकात जोरदार वाद झाला होता. २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गौतम गंभीर आणि एमएस धोनी यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी केली होती. तेव्हा पाकिस्तानी यष्टिरक्षक अकमलने गंभीरचा यष्टीमागे झेल घेतल्याचे अपील केले. पंचांनी त्याचे हे अपील फेटाळून लावले. त्यानंतर झालेल्या ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी, गंभीर आणि अकमलचा वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. एमएस धोनी आणि पंचांनी मध्यस्थी करून दोन्ही खेळाडूंना शांत केले होते.

विक्रम साठ्येने आपल्या कार्यक्रमामध्ये गौतम गंभीरला याबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा गंभीर म्हणाला होता, “मी चेंडू पूर्णपणे मिस केला होता. तरीही अकमलने अपील केले होते. मी त्याला सांगितले की अपील करण्यात काही अर्थ नाही. त्यावरून वाद सुरू झाला आणि तो वाढत गेला.”

हेही वाचा – Video: युवराज सिंग म्हणतो, “किसी डिस्को में जाए…”, गोविंदाच्या गाण्यावरील डान्स व्हायरल

२) हरभजन सिंग आणि शोएब अख्तर वाद

२०१०च्या आशिया चषकामध्येच आणखी एक वादग्रस्त घटना घडली होती. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यांच्यात सामन्याच्या ४७ व्या षटकात जोरदार वाद झाला. हरभजनने अख्तरच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. या वादामुळे अख्तर एवढा संतापला होता की, सामना संपल्यानंतर तो हरभजन सिंगला मारण्यासाठी हॉटेलमध्येही गेला होता. स्वत: अख्तरने या गोष्टीचा खुलासा केला होता.

३) एमएस धोनी-तस्किन अहमद वादग्रस्त फोटो

२०१६ मधील आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी, बांगलादेशचा तस्किन अहमद आणि एमएस धोनीच्या विकृत फोटोने सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. या फोटोमध्ये एमएस धोनीचे शीर तस्किनच्या हातात दाखवण्यात आले होते. अंतिम फेरीपूर्वी, भारताचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “वृत्तपत्रे पाहणे हे आमचे काम नाही. आमचे काम क्रिकेट खेळणे आहे. दैनिकांमध्ये कोणत्या कथा प्रकाशित होत आहेत हे शोधणे तुमचे काम आहे. तुम्ही सर्वजण त्या कथा वाचून त्यांचे आकलन करू शकता.”

MS Dhoni Taskin Ahmed photoshopped image
फोटो सौजन्य – ट्विटर/इंडियन एक्सप्रेस

हेही वाचा – Video: ‘धोनीसह सराव की सचिनसह जेवण?’, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने क्षणात दिले उत्तर

४) जेव्हा ‘कॅप्टन कूल’ धोनी संतापला होता

२०१६च्या आशिया चषक स्पर्धा पंचांच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे चर्चेत आली होती. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान आशिष नेहराच्या चेंडूवर पंचांनी पाकिस्तानच्या खुर्रम मंजूरला नाबाद दिल्याने एमएस धोनीचा संयम सुटला होता. भारताचे जोरदार अपील फेटाळले गेले तेव्हा नाराज धोनीने बांगलादेशी पंचांशी वाद घातला होता. त्याने जाहीरपणे पंच शरफुद्दौला इब्ने शाहिद यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

५) मोहम्मह सामीचे १७ चेंडूंचे षटक

२००४ मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषक सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद सामीने गोलंदाजीची सुरुवात केली होती. त्याने पहिले षटक निर्धाव टाकले होते. मात्र, त्यानंतर त्याने एकाच षटकात सात वाइड आणि चार नो-बॉल फेकले. त्यामुळे त्याच्या नावावर तब्बल १७ चेंडूंच्या षटकाची नोंद झाली होती.