दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाच्या पराभवाचे दशावतार पाहायला मिळाले आहेत. जागतिक क्रमवारीतील आठव्या स्थानावरील न्यूझीलंडकडून तीन पराभव स्वीकारून मालिका गमवावी लागल्याने भारताचे अव्वल स्थान खालसा झाले आहे. आता उरली-सुरली लाज वाचवण्यासाठी अखेरचा सामना तरी जिंका रे.. अशी साद भारतीयांकडून ऐकायला मिळत आहे. एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि पाचवा सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार असून न्यूझीलंडचा संघ कामगिरीतील सातत्याच्या जोरावर हा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे, तर भारतीय संघ अजूनही या दौऱ्यातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
मालिकेतील पहिला सामना भारताला २४ आणि दुसरा सामना १५ धावांनी गमवावा लागला. तिसरा सामना बरोबरीत सुटला असला तरी चौथ्या सामन्यात भारताला सात विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. यामुळे गेल्या दोन आठवडय़ांतील बोथट कामगिरीमुळे संघाचे मनोबल खचलेले असेल. भारताच्या गोलंदाजीचे वस्त्रहरण आतापर्यंत पाहायला मिळाले आहे, तर फलंदाजांनाही आतापर्यंत लय सापडलेली नाही. या सामन्यानंतर कसोटी मालिका असून या सामन्यातील विजयाचा भारताला फायदा होऊ शकतो. न्यूझीलंडच्या संघापुढे भारतीय फलंदाज आणि गोलंदाज हतबल झाल्याचेच पाहायला मिळाले आहे, पण काही गोष्टी सकारात्मकही आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांना चांगली लय सापडली आहे. रोहित शर्मालाही सूर गवसला आहे. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी सातत्याने बळी मिळवत असला तरी न्यूझीलंडच्या धावांवर नियंत्रण ठेवणे भारतीय गोलंदाजांना जमलेले नाही.
न्यूझीलंडला चारही सामन्यांमध्ये कुणी ना कुणी तरी नायक सापडला. कोरे अँडरसन, मार्टिन गप्तील, रॉस टेलर यांनी संघाला एकहाती विजय मिळवून दिले आहेत, तर केन विल्यम्सनने चारही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजीमध्ये मिचेल मॅक्लेघन, टीम साऊदी भेदक मारा करत आहेत. त्यामुळे या अखेरच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडसाठी हीरो कोण ठरतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे, वरुण आरोन आणि अमित मिश्रा.
न्यूझीलंड : ब्रेन्डन मॅक्क्युलम (कर्णधार), कोरे अँडरसन, मार्टिन गप्तील, मिचेल मॅक्लेघन, नॅथम मॅक्क्युलम, कायले मिल्स, जेम्स नीशम, ल्यूक राँची (यष्टिरक्षक), जेसी रायडर, टीम साऊदी, रॉस टेलर, केन विल्यम्सन, हमिश बेनेट आणि मॅट हेन्री.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनीवर.
वेळ : सकाळी ६.३० वा. पासून.

मॅट हेन्रीचा संघात समावेश
भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेगवान गोलंदाज टीम साऊदी किंवा अष्टपैलू कोरे अँडरसन यांना विश्रांती देण्याचा विचार न्यूझीलंडचे संघ व्यवस्थापन करत आहे. या दोघांपैकी एकाला विश्रांती दिली तर त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला संघात स्थान देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे.

या मालिकेत आम्ही बऱ्याचदा बिथरलेले पाहायला मिळालो, हे प्रमाण आम्ही कमी केले तर सकारात्मक निर्णय लागू शकतो. माझ्या मते ही काही मोठी समस्या नाही. पण फलंदाजी आणि गोलंदाजी लौकिकाला साजेशी होत नसून ही आमच्यापुढील मोठी समस्या आहे.
रवींद्र जडेजा, भारताचा अष्टपैलू.

आम्ही ज्या पद्धतीने सातत्यपूर्ण कामगिरी करत आहोत, हे पाहून भारतीय संघ भंडावून गेला आहे. आता आम्हाला मालिका ४-० अशी जिंकायची संधी असून या संधीचा नक्की आम्ही फायदा करून घेऊ. या मालिका विजयाचा फायदा आम्हाला यापुढील सामन्यांसाठी नक्कीच होईल.
– ब्रेन्डन मॅक्क्युलम, न्यूझीलंडचा कर्णधार.