पहिल्या चारही सामन्यांमध्ये श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवल्यावर अखेरचा सामना जिंकून निर्भेळ यशाचे स्वप्न भारतीय संघ पाहात आहे, तर दुसरीकडे रविवारी होणारा पाचवा एकदिवसीय सामना जिंकून किमान शेवट गोड करण्याकडे श्रीलंकेचा कल आहे.
रोहित शर्माचे विश्वविक्रमी द्विशतक हे चौथ्या सामन्याचे वैशिष्टय़ होते. या अप्रतिम खेळीमुळे त्याचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. दुसरीकडे सलामीवीर अजिंक्य रहाणेलाही मोठी खेळी साकारण्यासाठी त्याची ही खेळी प्रेरणादायक ठरू शकते. कर्णधार विराट कोहली आणि अंबाती रायुडूही चांगल्या फॉर्मात आहेत. या सामन्यात सुरेश रैनाला विश्रांती देण्यात आली असून, युवा खेळाडूंना संधी देण्याची ही नामी संधी असेल. महाराष्ट्राच्या केदार जाधवला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. रॉबिन उथप्पासाठी ही चांगली संधी ठरू शकेल. गोलंदाजीमध्ये युवा धवल कुलकर्णी आणि उमेश यादव यांनी भेदक मारा करत चमकदार कामगिरी केली होती, पण फिरकीपटू कर्ण शर्माला या संधीचा फायदा उचलता आला नव्हता.
एकदिवसीय सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाची एवढी जबरदस्त वाताहत यापूर्वी कधी झाली नसेल तेवढी गेल्या सामन्यात झाली होती. श्रीलंकेच्या गोलंदाजीचे पितळ उघडे पडले असून त्यांचा मारा बोथट, दिशाहीन असल्याचे सातत्याने दिसत आहे. फलंदाजीमध्येही कोणालाच सातत्य दाखवता आलेले नाही. त्यामुळे गेल्या सामन्यात ढासळलेल्या मनोबलातून उभे राहणे श्रीलंकेसाठी नक्कीच सोपे नसेल.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2014 रोजी प्रकाशित
आता निर्भेळ विजयाचा पंच!
पहिल्या चारही सामन्यांमध्ये श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवल्यावर अखेरचा सामना जिंकून निर्भेळ यशाचे स्वप्न भारतीय संघ पाहात आहे
First published on: 16-11-2014 at 07:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5th odi india vs sri lanka