कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला परीक्षेच्या मोसमाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे या स्पध्रेत अपेक्षित असलेल्या १६ पुरुष आणि १६ महिला अशा ३२ संघापैकी आठ संघांनी गैरहजर राहणे पसंत केले आहे. पुरुष विभागात हिंगोली, नंदुरबार आणि औरंगाबाद हे तीन, तर महिला विभागात औरंगाबाद, सांगली, अकोला, अमरावती आणि नाशिक हे पाच संघ अनुपस्थित राहिले आहेत.
भरघोस रोख पारितोषिक रकमांचा समावेश असलेल्या या स्पध्रेत प्रत्येक विजयासाठी जसे संघाला पाच हजार रुपये इनाम मिळत आहेत, तसेच प्रत्येक पराभवापोटीसुद्धा अडीच हजार मिळत आहेत. त्यामुळे या सूत्रात साखळीतील तिन्ही सामने पराभूत झालेला संघही साडेसात हजार रुपयांचा धनी होणार आहे, परंतु गैरहजर राहणाऱ्या संघांनी या रोख बक्षिसांवरही पाणी सोडले आहे.
महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्यातर्फे ५ ते ९ मार्च या कालावधीत होणाऱ्या १५व्या छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पध्रेसाठी शासनाने दरवर्षीप्रमाणे ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. याचप्रमाणे स्थानिक नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे आर्थिक पाठबळही स्पध्रेच्या पाठीशी आहे. याशिवाय स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूला बाइक आणि स्कूटी देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर दोन्ही गटांमधील विजेत्या संघांना दुबईवारीसुद्धा घडणार आहे, परंतु या आठ संघांनी ही संधी दवडली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह मोहन भावसार यांनी सांगितले की, ‘‘मार्च महिन्यात बहुतांशी खेळाडू हे परीक्षांना सामोरे जातात. त्यामुळे या आठ संघांना स्पध्रेत सहभागी होता आलेले नाही.’’
याचप्रमाणे राज्य संघटनेचे संयुक्त सचिव रमेश देवाडीकर म्हणाले की, ‘‘या स्पध्रेत सहभागी न झालेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे यांच्याप्रमाणे शेकडो संघ कार्यरत नाहीत. मोजके संघ आणि शाळा-महाविद्यालयांत शिकणारी ही मुले त्यामुळे त्यांना स्पर्धेत भाग घेता आलेला नाही.’’