राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत पुण्याविरुद्धच्या महत्त्वाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात गुडघादुखीमुळे खेळू न शकलेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेकडून उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनने लेखी खुलासावजा निवेदनाची मागणी केली आहे. या स्पर्धेत उपनगर संघाचा पुण्याने पराभव केला. त्यामुळे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या सामन्यात अभिलाषा खेळली असली, तर उपनगरचा संघ पराभूत झाला नसता अशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची धारणा आहे. त्याबाबत संघटनेच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीतही जोरदार चर्चा झाली. या स्पध्रेला हजेरी लावणारे उपनगरचे पदाधिकारीसुद्धा अभिलाषाच्या दुखापतीबाबत अनभिज्ञ होते. त्यामुळेच तिला दुखापतीबाबत निवेदन सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
पुण्यातील धनकवडी येथे २० ते २४ डिसेंबर या कालावधीत झालेल्या ६१व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेतून राष्ट्रीय स्पध्रेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ निवडण्यात आले. दुखापतीमुळे अभिलाषा अंतिम सामन्यात खेळू शकली नाही. मात्र त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ती खेळली होती. त्यानंतर काही दिवसांनी राज्य संघाच्या शिबिराला ती हजर झाली आणि महाराष्ट्राचे नेतृत्व भूषवले. अभिलाषाच्या दुखापतीबाबत उपनगर असोसिएशन संभ्रमात आहे.
‘‘उपनगरचा संघ चढाया आणि पकड या दोन्ही आघाडय़ांमध्ये परिपूर्ण होता. उपनगरच्या संघाची मदार ही प्रामुख्याने अभिलाषाच्या आक्रमक चढायांवर होती. परंतु उपांत्य फेरीत झालेल्या दुखापतीमुळे तिने अंतिम फेरीत खेळण्यास नकार दिला. अभिलाषावर प्रथमोपचार करून उपनगर संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक तिला मैदानावर उतरवण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु गुडघादुखीमुळे तिने खेळण्यास नकार दिला. आपल्या संघातील आघाडीची खेळाडू खेळत नसल्यामुळे अन्य खेळाडूंच्या मनोधर्यावर परिणाम झाला आणि उपनगर संघाला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला़,’’ असे पडसाद उपनगरच्या कार्यकारिणीमध्ये उमटले.
‘‘या स्पध्रेच्या वेळी उपनगर कबड्डी असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. अभिलाषाला झालेल्या गुडघादुखीप्रमाणे त्यांनाही सामन्याच्या निकालाची चिंता लागून राहिली होती. मात्र कार्यकारिणी सदस्यांना सामन्यादरम्यान व त्यानंतरही अभिलाषाला गुडघादुखीमुळे त्रास होत असेल, असे जाणवले नाही. तसेच याबाबत आपण असोसिएशनला कोणतेही लेखी निवेदन दिले नाही,’’ असे अभिलाषाला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या १४ जानेवारीला झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि अभिलाषाला गुडघादुखी व उपचाराबाबत लेखी निवेदन सादर करण्याचे पत्र पाठवण्यात यावे, असे निश्चित करण्यात आले.
त्यानुसार तिला पत्र पाठवण्यात आले असून, असोसिएशन तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.
मुंबईविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिसऱ्याच मिनिटाला मला दुखापत झाली होती, परंतु तरीही हा सामना मी पूर्ण केला. त्यामुळे गुडघ्याच्या दुखापतीमुळे मी अंतिम सामन्यात खेळू शकले नाही. माझ्या दोन्ही गुडघ्यांवर अनुक्रमे २००७ आणि २००८ या वर्षांत दोन मोठय़ा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या दुखापतीनंतर महाराष्ट्राच्या संघाच्या सराव शिबिरापर्यंत म्हणजे २५ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत जो कालावधी मला उपलब्ध झाला. त्या काळात मी ज्या चाचण्या आणि उपचार केले. त्यांचे अहवाल मी असोसिएशनला भेटून सादर करणार आहे. या कालावधीत मी डॉक्टरांच्या सल्ल्याने योजनाबद्ध पद्धतीने दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेतली. आता मी राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केरळला जात आहे. मात्र आल्यानंतर मी माझ्या दुखापतीसंदर्भातील निवेदन सादर करेन.
-अभिलाषा म्हात्रे
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2015 रोजी प्रकाशित
कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेच्या गुडघादुखीबाबत संभ्रम
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत पुण्याविरुद्धच्या महत्त्वाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात गुडघादुखीमुळे खेळू न शकलेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेकडून उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनने लेखी खुलासावजा निवेदनाची मागणी केली आहे.
First published on: 07-02-2015 at 09:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhilasha mhatre