Abhimanyu Easwaran Emotional Message: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या मालिकेत दमदार कामगिरी केली. ही मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त झाली. ही मालिका भारतीय संघाच्या हातून जवळजवळ निसटली होती. पण मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने ओव्हल कसोटीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे ही मालिका बरोबरीत समाप्त झाली. या मालिकेसाठी प्रामुख्याने युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. ज्यात अभिमन्यू ईश्वरनचा देखील समावेश होता. पण त्याला ५ पैकी एकाही सामन्यात संधी दिली गेली नाही.

अभिमन्यू ईश्वरनचा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही २०२१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, ४ वर्षे उलटूनही त्याला पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या ४ वर्षांत १५ खेळाडूंना भारतीय कसोटी संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पण अभिमन्यू ईश्वरनचा नंबर अजूनही लागलेला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून त्याने बऱ्याचदा भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. पण त्याला कसोटी संघासाठी पदार्पण करता आलेलं नाही.

विक्की लालवानीच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना अभिमन्यू ईश्वरनचे वडील रंगनाथन म्हणाले, “त्याला संधी न मिळाल्याने तो नाराज होता. मी त्याला कॉल केला, त्यावेळी तो मला म्हणाला, पप्पा मला अजूनही संघात स्थान मिळालेलं नाही. मी आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी बंगळुरूला जाणार आहे. तिथे तो १० ते १२ दिवस राहणार. त्यानंतर डेहराडूनला परतणार. तो चिंताग्रस्त असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. तरी तो म्हणाला, मी २३ वर्षांपासून हे स्वप्न जगतोय. एक- दोन सामन्यात निवड न झाल्याने हे स्वप्न तुटणार नाही.”//

गौतम गंभीर अभिमन्यू ईश्वरनला काय म्हणाला?

गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. अभिमन्यूच्या वडिलांनी गौतम गंभीरचा देखील उल्लेख केला. त्यांनी अभिमन्यू ईश्वरनला सांगितलं आहे की, “तू खूप चांगली कामगिरी करत आहेस. तुला खूप मोठी संधी मिळेल. मी तुला १-२ सामने खेळून बाहेर करणार नाही.” गंभीरने अभिमन्यू ईश्वरनला विश्वास पटवून दिला आहे की, त्याला भारतीय संघात लवकरच संधी मिळू शकते. पण त्याला संधी केव्हा मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.