Abhimanyu Easwaran: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातून करूण नायरला वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी पुन्हा एकदा साई सुदर्शनचा संघात समावेश करण्यात आला आहे. करूण नायर आणि साई सुदर्शनसह आणखी एक खेळाडू आहे जो संघात खेळण्यासाठी पात्र आहे. मात्र, त्याला संधी दिली जात नाहीये. गेल्या ४ वर्षांपासून हा खेळाडू भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी धडपड करत आहे, पण आजवर एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अभिमन्यू ईश्वरन आहे.

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज करूण नायरला मालिकेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये संधी दिली गेली होती. मात्र, त्याला या संधीचा फायदा घेता आलेला नाही.त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर केलं गेलं. त्याच्या जागी साई सुदर्शनला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली आहे. अभिमन्यू ईश्वरनचा देखील इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०२१ दौऱ्यावरही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, संधी मिळाली नव्हती.

अभिमन्यू ईश्वरन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गाजलेला फलंदाज आहे. मात्र, तु्म्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की अभिमन्यू ईश्वरनला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर एकूण १५ खेळाडूंना भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. ज्यात ध्रुव जुरेल, सरफराज खान, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, आकाशदीप, साई सुदर्शन, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, नितीश कुमार रेड्डी आणि अंशुल कंबोज या खेळाडूंचा समावेश आहे. अभिमन्यू ईश्वरनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मात्र, तरीदेखील त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. या दौऱ्यानंतर त्याला पुन्हा एकदा भारतीय स्थान मिळणार की नाही, हे देखील माहीत नाही. त्यामुळे त्याची कारकिर्द बाकावरच संपणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

अभिमन्यू ईश्वरनची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

अभिमन्यू ईश्वरन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचं प्रतिनिधित्व करतो. त्याला आतापर्यंत १०३ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ४८.७० च्या सरासरीने ७८४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २७ शतक आणि ३१ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान २३३ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ८९ सामन्यांमध्ये ४७.०३ च्या सरासरीने ३८५७ धावा केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.