Asia Cup 2025 Abhishek Sharma Haris Rauf & Shubman Gill Fight: अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पाकिस्तानविरूद्ध सुपर फोर सामन्यात वादळी फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी रचली. आपल्या वादळी फटकेबाजीसह या दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांशी मैदानावर चांगलाच पंगा घेतला. शाहीन शाह आफ्रिदीनंतर अभिषेक शर्मा आणि गिल हारिस रौफबरोबर भिडताना दिसले. याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

भारताने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. दरम्यान पाकिस्तानने सलामीवीर फरहानच्या फलंदाजीच्या बळावर १७१ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात अभिषेक आणि गिलने पाकिस्तानच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आपले मनसुबे जाहीर केले.

अभिषेक शर्माच्या पहिल्या चेंडूवर षटकारानंतर शाहीन आफ्रीदीने त्याच्याबरोबर बाचाबाची केली. शाहीन त्याला काहीतरी म्हणताच अभिषेकने त्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं. यानंतर गिलसुद्धा त्याच्याबरोबर फटकेबाजीत सामील झाला. यासह गिल-अभिषेकने ४ षटकांत ४३ धावा केल्यानंतर हारिस रौफ गोलंदाजीला आला.

अभिषेक-गिल-रौफमध्ये कशावरून झाली बाचाबाची?

हारिस पहिल्या चेंडूवर अभिषेकने चौकाराने सुरूवात केली. त्यानंतर एकेरी दुहेरी धावा दोघांनी घेतल्या. तर शेवटच्या चेंडूवर गिलने कमालीचा चौकार खेचला. हे पाहून हारिस रौफ स्ट्राईकर एन्डला असलेल्या गिलला काहीतरी म्हणाला, गिल त्याच्यावर तिथूनच ओरडला. तर जवळ असलेला अभिषेक शर्मा त्याच्याजवळ गेला आणि बोट दाखवत काहीतरी म्हणाला आणि त्याच्यामागून गिलही त्याच्यादिशेने धावून आला. भारताचे दोन्ही फलंदाज रौफच्या एका वाक्यावर त्याच्यावर धावून गेले आणि वाद झाला.

तिघांमध्ये वाद होताना पाहून पंचांनी हस्तक्षेप केला आणि हा वाद मिटवला. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत संघाचा स्कोअर फक्त २८ चेंडूत ५० च्या पुढे नेला. अभिषेक शर्मा ७४ धावांची खेळी करत बाद झाला. तर गिलचं अर्धशतक अवघ्या ३ धावांनी हुकलं.