भारतीय हॉकी संघाच्या गोलरक्षकांनी अधिक प्रभावीपणे आपली कामगिरी करावी यासाठी परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. या वृत्तास हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरेंद्र बात्रा यांनी दुजोरा दिला. इपोह (मलेशिया) येथे २४ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. जागतिक स्पर्धेसाठी भारताकरिता ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या स्पर्धेपूर्वीच या नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. मात्र ही नियुक्ती तात्पुरत्या कालावधीकरिता असणार आहे.
बात्रा यांनी सांगितले, आम्ही गोलरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी परदेशातील अनुभवी प्रशिक्षकास निमंत्रित करणार आहोत. मात्र त्याची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल. आम्ही प्राथमिक यादीतून तीन जणांची नावे निश्चित केली आहे. त्यामधून एका व्यक्तीची नियुक्ती केली जाणार आहे. ज्याच्या अटी आम्हास मान्य होतील त्याची निवड एकदोन दिवसांतच केली जाईल. त्याचे मानधन भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे दिले जाईल. आशिया चषक स्पर्धेद्वारे त्यांच्या कामास सुरुवात होईल.