सी.के.नायडू क्रिकेट स्पर्धा
महाराष्ट्राचा ५८२ धावांचा डोंगर
राहुल त्रिपाठीचे द्विशतक तर विशांत मोरे याचे शतक, तसेच या जोडीने केलेल्या त्रिशतकी भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत गुजरातविरुद्ध पहिल्या डावाच ५८२ धावांचा डोंगर रचला. उर्वरित खेळांत गुजरातने पहिल्या डावात १५५ धावा केल्या.
मोटेरा स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या धावसंख्येत त्रिपाठी व मोरे यांचा महत्त्वाचा वाटा होता. ही जोडी एकत्र आली त्यावेळी महाराष्ट्राची ६ बाद १२७ अशी दयनीय स्थिती होती. मात्र त्रिपाठी व मोरे यांनी अतिशय झुंजार खेळ करीत सातव्या विकेटसाठी ३८६ धावांची भागीदारी केली. कारकिर्दीत प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पहिलेच द्विशतक करणाऱ्या त्रिपाठीने ४५२ चेंडूंमध्ये २८२ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ३५ चौकार व आठ षटकार अशी फटकेबाजी केली. त्रिशतक पूर्ण होण्यापूर्वी तो अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोरे याने ३१२ चेंडूंमध्ये २४ चौकार व एक षटकारासह १७३ धावा केल्या. महाराष्ट्राने १९६.१ षटकांत ५८२ धावा केल्या. गुजरातकडून कमलेश ठाकोर व मोहित थडानी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
गुजरातच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी पहिले तीन गडी अवघ्या १४ धावांमध्ये गमावले. त्यानंतर सलामीवीर समीत गोहिल याने बराद हिमालया याच्या साथीत ६८ धावांची भर घातली व संघाचा डावा सावरला. बराद ३५ धावांवर तंबूत परतला. गोहिल याने अक्षर पटेल याच्या साथीत पाचव्या विकेटसाठी ७३ धावांची अखंडित भागीदारी केली. गोहिलने तेरा चौकारांसह नाबाद ७४ धावा केल्या. अक्षरने सात चौकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. पहिल्या डावात आघाडी मिळविण्यासाठी आणखी ४२८ धावांची आवश्यकता असून सहा विकेट्स त्यांच्या हातात आहेत. तूर्तास, महाराष्ट्राने विजेतेपदासाठी आपली बाजू भक्कम केली आहे.