जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये भारताच्या जितू राय याने ५० मीटर पिस्तूलमध्ये रुपेरी कामगिरी केली. तर महिलांच्या  दहा मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या आयोनिका पॉल हिने कांस्यपदक मिळवीत आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पदकाचे स्वप्न साकार केले.
जितू याला ५० मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदकापासून वंचित व्हावे लागले. त्याने प्राथमिक फेरीत ५६८ गुण तर अंतिम फेरीत १९३.१ गुण नोंदविले. सर्बियाच्या दामिर मिकेक याने प्राथमिक फेरीत ५६८ तर अंतिम फेरीत १९३.२ गुण मिळवीत सुवर्णपदक जिंकले. जपानच्या तोमोयोकी मात्सुदा याला कांस्यपदक मिळाले.
आयोनिका या २१ वर्षीय खेळाडूने पात्रता फेरीत ४१७.३ गुणांची नोंद केली. त्यानंतर अंतिम फेरीत तिने १८५.३ गुण नोंदवीत कांस्यपदक पटकाविले.
हे पदक मिळविल्यानंतर आयोनिका म्हणाली, हे माझे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक असल्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे. माझ्या या यशाचे श्रेय ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट या संस्थेला द्यावे लागेल. त्यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळेच मला ऑस्ट्रियात सराव करण्याची व ख्यातनाम प्रशिक्षक थॉमस फर्निक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्याची संधी साधता आली. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे फिजिओ वैभव आगाशे व क्रीडा वैद्यक तज्ज्ञ डॉ. निखिल लाटे यांचेही मला बहुमोल सहकार्य मिळाले आहे.
लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेती खेळाडू येई सिलिंग (चीन) हिने या स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. तिने २०९.६ गुण मिळविले. वुई लिउस्की हिने २०७.६ गुणांसह रौप्यपदक मिळविले.