Mohammed Shami Daughter Holi: रमजानच्या महिन्यात भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास न केल्याबद्दल ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी त्याच्यावर टीका केली होती. शमीने शरियत कायद्यानुसार पाप केले आहे, असा आरोप रझवी यांनी एका व्हिडीओद्वारे केला होता. आता त्यांनी एक नवीन व्हिडीओ प्रसारित केला असून त्यात मोहम्मद शमीच्या मुलीवर टीका केली आहे.

रझवी म्हणाले, “मोहम्मद शमीची मुलगी लहान आहे. जर तिने अजाणतेपणी होळीत रंग उधळले असतील तर तो गुन्हा नाही. पण तिला समज असेल आणि ती जाणूनबुजून होळी खेळली असेल तर हा शरीयत नुसार गुन्हा आहे.” रझवी पुढे म्हणाले की, शमीला यापूर्वीही इस्लामच्या तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. पण तरीही त्याच्या मुलीचा होळी साजरा करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

“मोहम्मद शमी आणि त्याच्या परिवाराला मी आवाहन केले होते की, जे शरीयतमध्ये नमूद केलेले नाही, त्यात तुमच्या मुलांना सहभागी करू नका. होळी हा हिंदूंचा निश्चितच मोठा सण आहे. पण मुस्लीम लोकांनी होळीपासून दूर राहिले पाहिजे. जर शरीयतचा कायदा माहीत असूनही जर कुणी होळी खेळत असेल तर तो गुन्हा ठरतो”, अशी प्रतिक्रिया मौलाना रझवी यांनी दिली आहे.

याशिवाय रझवींनी मोहम्मद शमीवर रोजा न पाळल्याबद्दल टीका केली होती. पण भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांनी संघाचे कौतुक केले आहे. मी टीम इंडियाचे अभिनंदन व्यक्त करतो. तसेच मोहम्मद शमीलाही मनापासून शुभेच्छा देतो, असे मौलाना रझवी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच मौलाना रझवींनी शमीवर टीका केली होती. ते म्हणाले होते, “इस्लाममध्ये रोझा पाळणे हे कर्तव्य आहे. एखादी व्यक्ती जाणून बुजून रोजा पाळत नसेल तर तो अट्टल गुन्हेगार आहे. मोहम्मद शमीने रोजा पाळला नाही. मुळात ते त्याचे कर्तव्य आहे. रोजा न पाळून मोहम्मद शमीने मोठा गुन्हा केला. शरीयतच्या नियमानुसार तो मोठा गुन्हेगार आहे. त्याला आता माफी मागावी लागेल.”