2030 CWG Games : राष्ट्रकुल स्पर्धा २०३० (Commonwealth Games) चं यजमानपद भुषवण्यासाठी अहमदाबाद सज्ज झालं आहे. राष्ट्रकुल स्पर्धा कार्यकारी मंडळाने अहमदाबादमध्ये स्पर्धांचं यजमानपद मिळावं अशी शिफारस करणार असल्याचं म्हटलं आहे. अहमदाबादला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद दिलं जावं यासाठी ही शिफारस केली जाणार आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय २६ नोव्हेंबर २०२५ ला ग्लासगोमध्ये होणाऱ्या महासभेत घेतला जाईल. भारताच्या बाजूने निर्णय झाला तर भारताला दुसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद मिळणार आहे. याआधी २०१० मध्ये दिल्लीत या स्पर्धा रंगल्या होत्या. त्यावेळी देशात काँग्रेसचं सरकार होतं. राष्ट्रकुल स्पर्धांमधल्या ढिसाळ नियोजनावरुन आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन तेव्हा केंद्र सरकारला टीका सहन करावी लागली होती. आता २०३० मध्ये यजमानपद जर भारताला मिळालं तर अहमदाबादमध्ये कसं नियोजन असणार? याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे.
राष्ट्रकुल क्रीडा मूल्यांकन समितीने राबवली दीर्घ प्रक्रिया
राष्ट्रकुल क्रीडा मूल्यांकन समितीने एक विस्तृत प्रक्रिया राबवून त्यानंतर अहमदाबादच्या नावाची शिफारस केल आहे. या समितीने तांत्रिक बाजू, अॅथललिट्सना येणारे अनुभव, पायाभूत सुविधा, सरकार आणि राष्ट्रकुल स्पर्धांची मूल्यं या सगळ्या पैलूंचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे. आयोजकांच्या स्पर्धेत भारताने नायजेरियाला मागे टाकलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
भारताला यजमानपद मिळालं तर ऐतिहासिक क्षण
१९३० मध्ये कॅनडाच्या हॅमिल्टन शहरापासून राष्ट्रकुल स्पर्धांची सुरुवात झाली होती. आता २०३० मध्ये भारताला जर यजमानपद मिळालं तर राष्ट्रकुल स्पर्धेतला हा ऐतिहासिक क्षण असणार आहे यात शंका नाही. भारताचा राष्ट्रकुल स्पर्धांचा इतिहास गौरवास्पद आहे. बर्मिंघम २०२२ च्या पदकांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया
याबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “भारतासाठी हा खूप आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. २०३० मध्ये अहमदाबादमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारताच्या दाव्याला राष्ट्रकुल संघटनेने मान्यता दिल्याबद्दल भारतातील प्रत्येक नागरिकाचे हार्दिक अभिनंदन. जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताला स्थान मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अथक प्रयत्न केले आहेत.”
पी. टी. उषा याबाबत काय म्हणाल्या?
कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशनच्या भारताच्या अध्यक्ष डॉ. पी. टी उषा म्हणाल्या राष्ट्रकुल स्पर्धांना १०० वर्षे २०३० मध्ये होत आहेत. अशा क्षणी जर भारताला यजमानपद मिळालं तर तो एक ऐतिहासिक क्षण असेल. भारतात जागतिक स्तरावरच्या खेळांचं आयोजन या कालावधीत घडेल. तसंच विकसित भारताच्या २०४७ च्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल असेल.
कॉमनवेल्थ स्पोर्ट्सचे अंतरिम अध्यक्ष डोनाल्ड रुकार म्हणाले २०३० मध्ये ज्या राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहेत त्यासाठी यजमान पद कुणाला मिळणार हे अद्याप निश्चित व्हायचं आहे. पण आम्ही भारत आणि नायजेरिया या दोन्ही देशांचे आभार मानतो. दोन्ही देशांचे प्रस्ताव प्रेरणादायी होते. कॉमनवेल्थ कुटुंबाने याबाबत सकारात्मक विचार केला आहे. भारताने सर्वात आधी १९३४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी भारताचे सहा अॅथलिट स्पर्धेत सहभागी झाले होते असंही डोनाल्ड यांनी सांगितलं.