वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपवला. कित्येक वेळा सेमीफायनल आणि फायनलमध्ये येऊन पराभूत होणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला चोकर्स म्हटलं जाऊ लागलं होतं. आता दक्षिण आफ्रिकेने हा टॅग पुसून काढला आहे. त्यामुळे खेळाडूंनीही जोरदार जल्लोष केला. दरम्यान एडन मारक्रमने केलेल्या हटके सेलिब्रेशनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. कर्णधार तेंबा बावूमाने आपल्या मुलाला कडेवर घेत मैदानाची प्रदक्षिणा घातली. तर एडन मारक्रम आपल्या पत्नीला किस करताना दिसून आला.
पत्नीला किस, मित्रासोबत बियर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजयाचा जल्लोष एडन मारक्रमने हटके स्टाईलने केला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर एडन मारक्रम स्टेडियममध्ये असलेल्या चाहत्यांकडे गेला. त्याने एका चाहत्याकडून बीअरचा ग्लास घेतला आणि एकाच घोटात ग्लास रिकामा केला. ज्याने ग्लास दिला तो एडन मारक्रमचा शाळेतील मित्र होता. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने याबाबत खुलासा केला. मित्रासोबत विजयाचा जल्लोष केल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला किस करत मिठी मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोण आहे एडन मारक्रमची पत्नी?
एडन मारक्रमच्या पत्नीचं नाव डॅनियल मारक्रम आहे. माध्यमातील वृत्तानुसार ती उद्योजिका आहे. ती निकोल, नाडोरा या ज्वेलरी ब्रँडची मालकीण आहे. यासह ती आपल्या ब्रँडसाठी मॉडेलिंग देखील करते. एडन मारक्रम आणि निकोल हे दोघेही १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर २०२३ मध्ये दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून एडन मारक्रमने सर्वाधिक १३६ धावांची खेळी केली. एडन मारक्रम या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
त्याला साथ देत कर्णधार तेंबा बावूमाने ६६ धावांची खेळी केली. यासह दक्षिण आफ्रिकेने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनंतर आयसीसीच्या ट्रॉफीवर कब्जा केला.