South Africa Game Changer in WTC Final: दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव करत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावे केलं. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच खेळाडूंनी संघाच्या या ऐतिहासिक विजयात मोठं योगदान दिलं आहे. कगिसो रबाडाने संघाच्या गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला धावा करण्यापासून रोखला. आफ्रिकेच्या या विजयाचा मॅचविनर खेळाडू ज्याने अष्टपैलू कामगिरी करत आपली महत्त्वाची भूमिका बजावली.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयात संघातील प्रत्येक खेळाडूने आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. पण संघातील अष्टपैलू खेळाडूने बॅट आणि चेंडू दोन्हीने आपली कामगिरी चोख बजावली आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरला. दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू म्हणजे एडन मारक्रम. मारक्रमचं फक्त शतकच नाही तर त्याने संघासाठी महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पहिल्या डावात फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. पण अनुभवी स्टीव्ह स्मिथ मात्र अर्धशतकी खेळत संघाचा डाव पुढे नेत होता. मारक्रम हा संघाचा पार्ट टाईम गोलंदाज आहे. मारक्रम एक गेमचेंजर गोलंदाजही राहिला आहे आणि त्याने फायनलमध्येही अशीच गोलंदाजी केली. त्याने २ षटकांची स्पेल टाकली. ज्यात त्याने ५ धावा देत १ विकेट घेतली. ही विकेट होती स्टीव्ह स्मिथची. स्टीव्ह स्मिथ ६६ धावा करत झेलबाद होत माघारी परतला आणि मारक्रमने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पडली.
गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजीला उतरलेला एडन मारक्रम पहिल्या डावात खातं ही न उघडता बाद झाला. यानंतर दुसऱ्या डावातही मारक्रमला दोन षटकांची स्पेल टाकण्याची जबाबदारी दिली, इथेही मारक्रमने संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. हेझलवूड आणि स्टार्कची जोडी चांगली फलंदाजी करत होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येत मोठी भर घातली होती. मारक्रमने त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर जोश हेझलवूडला झेलबाद करवत संघासाठी मोठी कामगिरी फत्ते केली.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे आव्हान दिले होते. दुसऱ्या डावात उतरलेल्या मारक्रमने सावध पण वेळेस आक्रमक फटके खेळत आपल्या डावाला सुरूवात केली. मारक्रम फिरकी, वेगवान गोलंदाजीविरूद्ध कमालीचा डिफेन्स करत चांगले फटके खेळत होता. रिकल्टन, मुल्डर, बावूमा, स्टब्स यांच्याबरोबर भागीदारी साधत त्याने शतकी खेळी केली. मारक्रमने २०७ चेंडू खेळत १४ चौकारांच्या मदतीने १३६ धावांची मॅचविनिंग खेळी केली. या खेळीसह त्याने आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.