कोल्हापूर आणि सांगली शहरात पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पाणी ओसरत असले, तरी अजून सांगलीत पाणी धोक्याच्या पातळीवर आहे. तर कोल्हापुरात पंचगंगेचे पाणी वेगाने उतरत असून चंदगड, शिरोळ तालुक्यात पुराचे संकट कायम आहे. अशा परिस्थितीत सेलिब्रिटींपासून ते जनसामान्यांपर्यंत सारेच शक्य ती मदत करत आहेत. त्यात भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने या पूरपरिस्थितीवर एक भावनिक ट्विट केले आहे.

अजिंक्य रहाणे  “आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा”, असे ट्विट करत त्याने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, गावात राहिलेल्या पूरग्रस्तांना प्रती दिन प्रतीमाणसी ६० रुपये, तर लहान मुलांना ४५ रुपये गावात जाऊन दिले जाणार आहेत. शिबिरांमध्ये पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या सेवाभावी संस्थाना शासकीय दराने प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

साथीच्या रोगांची भीती असल्याने राज्यातील अनेक शहरांतून वैद्यकीय पथकेही येथे दाखल झाली आहेत. अगदी बोटीत बसूनही पूरग्रस्तांची तपासणी करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातून विक्रमी ५ लाख ४० हजार क्युसेकचा विक्रमी विसर्ग सुरू झाल्याने पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. ताशी एक इंचाने पाणी पातळी कमी होत असली तरी सगळा पूर ओसरण्यास दोन-तीन दिवसांचा अवधी लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कोल्हापुरात पाण्याची पातळी कमी झाल्याने मदतकार्याला वेग आला असून काही ठिकाणी पाणी असल्याने शिरोळमधून आणखी ४५ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रथमच ५० फुटापेक्षा कमी झाली. शिरोळ तालुक्यात बचाव कार्याला तर कोल्हापूर शहरासह अन्यत्र मदतकार्याला वेग आला आहे. चंदगड, शिरोळ तालुक्यात महापुराचे संकट अद्यापही आहे. शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर करण्यात आले. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी कमी होत आहे. शनिवारी सायंकाळी ५१ फूट ६ इंच असणारी पाणीपातळी २४ तासांत ४९ फूट १० इंच इतकी कमी झाली. अद्यापही १०४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे-बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी प्रायोगिक वाहतूक सुरू केली. अद्याप महामार्गावर पाणी असल्याने वाहतूक सुरू करण्यास मर्यादा आल्या. सोमवापर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.