Ajinkya Rahane on BGT Series: रणजी ट्रॉफी २०२५-२६ मधील दुसऱ्या फेरीत मुंबईचा सामना छत्तीसगडविरुद्ध होत आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने मोठी धावसंख्या उभारली. मुंबई संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत संघाच्या या मोठ्या धावसंख्येत महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर मुंबईने ८ विकेट गमावून ४०६ धावा केल्या आहेत. यानंतर त्याने भारताच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत मोठं वक्तव्य करत निवडकर्त्यांना सुनावलं आहे.
अजिंक्य रहाणेने छत्तीसगढविरूद्ध सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील ४२वं प्रथम श्रेणी शतक झळकावलं. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३८ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या, यानंतर फलंदाजीला आलेल्या रहाणेने संघाचा डाव सावरला. रहाणेने या डावात ३०३ चेंडूंचा सामना करत १५९ धावा केल्या. त्याच्या डावात २१ चौकारांचा समावेश होता. या डावात क्रॅम्प्समुळे तो रिटायर हर्टही झाला. पण नंतर तो मैदानात परतला आणि संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
२०२४-२५ हंगामात भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आल्याबद्दल अजिंक्य रहाणेने निराशा व्यक्त केली. ३७ वर्षीय रहाणेने त्याच्या वयाबद्दलच्या चिंता फेटाळून लावल्या आणि म्हणाला, “वय महत्त्वाचं नाही, हेतू महत्त्वाचा आहे. कसोटी क्रिकेटबद्दलची आवड आणि मैदानावर कठोर परिश्रम महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वयासंबंधित मुद्दा तर मला मान्य नाही.”
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीविषयी बोलताना काय म्हणाला रहाणे?
रहाणेने ऑस्ट्रेलियचा महान खेळाडू माइक हसीचं उदाहरण दिलं, “ज्याने वयाच्या ३० व्या वर्षी कसोटीत पदार्पण केलं; तो म्हणाला, “तुम्ही पाहा, ऑस्ट्रेलियामध्ये मायकेल हसीने वयाच्या ३० व्या वर्षी पदार्पण केलं. तरीही, त्याने धावा केल्या. रेड-बॉल क्रिकेटमध्ये अनुभव महत्त्वाचा असतो. मला वैयक्तिकरित्या वाटलं की भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये माझी गरज होती.”
रहाणेने पुन्हा एकदा वयाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तो म्हणाला, “चौतीस-पस्तीशीनंतर खेळाडूंकडे वयस्कर खेळाडू म्हणून पाहिलं जातं, पण ते नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. जर एखाद्या खेळाडूला खरोखरच रेड-बॉल क्रिकेट खेळण्यात रस असेल तर तो नेहमीच सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं निवडकर्त्यांनी याकडे लक्ष द्यायला हवं, कारण ते सामने पाहण्यासाठी येतात. कामगिरी नेहमीच महत्त्वाची नसते. कधीकधी हेतू आणि आवड आणि तुम्ही लाल चेंडूचं क्रिकेट कसं खेळता हे महत्त्वाचं असतं.”
अजिंक्य रहाणे निवडकर्त्यांबाबत काय म्हणाला?
रहाणेने निवडकर्त्यांकडून फारसा संवाद न साधला गेल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. तो म्हणाला, “मला वाटलं की माझ्यासारख्या अनुभवी खेळाडूला अधिक संधी मिळायला हव्यात, पण माझ्याशी कोणताच संवाद साधला नाही गेला. मी फक्त माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो, जे मी सध्या करत आहे. पण म्हटल्याप्रमाणे, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये माझी गरज होती आणि मी पूर्णपणे तयार होतो.”
अजिंक्य रहाणेला झाला रोहितच्या शतकाचा आनंद
रोहित-विराटच्या सिडनीमधील कामगिरीबद्दल रहाणेने वक्तव्य केलं आणि रोहितच्या शतकामुळे त्याला आनंद झाल्याचा उल्लेखही त्याने केला. जेव्हा संघात रोहित आणि विराटसारखे खेळाडू असतात, ज्यांनी भारतासाठी खूप सामने जिंकले आहेत, विशेषतः वनडे-टी-२० मध्ये, तेव्हा संघात तो अनुभव हवा असतो. संघात फक्त नवीन खेळाडू किंवा तरुण खेळाडू असू शकत नाहीत. तरुण खेळाडू महत्त्वाचे आहेत, पण जर जोडीला अनुभव असेल तर संघ चांगली कामगिरी करेल. “हे विशेषतः रेड-बॉल क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं. रोहितला शतक झळकावताना पाहून मला खरोखर आनंद झाला.”
रणजीच्या या हंगामापूर्वीच अशा अफवा होत्या की रहाणेचं मुंबई संघात स्थान अनिश्चित आहे. पण यानंतर आता रहाणे त्याच्या शतकामुळे खूप आनंदी आहे. रहाणेने हे शतक त्याच्या कुटुंबाला समर्पित केलं आणि टीकाकारांना सुनावलं. बरेच लोक असे आहेत. त्यांना खेळ माहित नसला तरी ते अशा खेळाडूबद्दल बोलतात जे सातत्याने चांगल्या वृत्तीने आणि तीव्रतेने खेळत असतो. मला नेहमीच मुंबईसाठी चांगली कामगिरी करायची असते. त्यांना माहित नाहीये की त्यासाठी किती कष्ट करावे लागतात? माझ्या कुटुंबाचा आणि मुलांचा मला प्रचंड पाठिंबा होता. मला माझी मुलं नेहमी म्हणतात, ‘बाबा, तुम्ही हे करू शकता.”
