भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने दुलीप करंडक स्पर्धा जिंकली आहे. त्यांनी अंतिम फेरीत दक्षिण विभागाचा २९४ धावांनी पराभव केला. पश्चिम विभागाने पहिल्या डावात २७० धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिणेने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. पश्चिमने दुसऱ्या डावात ४ बाद ५८५ अशी डोंगरा एवढी धावसंख्या उभारली. दक्षिण संघाला सामना जिंकण्यासाठी ५२९ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु दुसऱ्या डावात त्यांना केवळ २३४ धावाच करता आल्या. १९ व्यांदा दुलीप करंडक जिंकण्यात पश्चिम विभागाचा संघ यशस्वी ठरला.

पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात जबरदस्त पुनरागमन केले. चौथ्या दिवशी यशस्वी जैस्वाल (२६५), सर्फराज खान (१२७) आणि हेत पटेल (नाबाद ५१) यांच्या शानदार खेळीच्या बळावर पश्चिम विभागाने दुसरा डाव चार गडी गमावून ५८५ धावांवर घोषित केला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण विभागाच्या ६ गडी गमावून १५४ धावा झाल्या होत्या. पाचव्या दिवशी संघाला कालच्या धावसंख्येत  केवळ ८० धावांची भर घालता आली.

अपयशी ठरलेल्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल याने दुसऱ्या डावात झंझावाती द्विशतक झळकावले. त्याने २६५ धावा केल्या. सरफराज खान १२७  धावा आणि हेत पटेल ५१ धावा करत नाबाद राहिले. यामुळे पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात ४ गडी गमावत ५८५ धावांचा डोंगर रचला. सामना सुरु असतानाचं यशस्वी जैस्वाल सतत दक्षिण विभागाच्या फलंदाजांची खासकरून रवी तेजाची स्लेजिंग करत होता. पंचांनी यशस्वीला दोन-तीन वेळा इशाराही दिला. मात्र डावाच्या ५७व्या षटकात यशस्वीने पुन्हा एकदा तेच केले तेव्हा पंचांनी आवरले नाही आणि कर्णधार रहाणेशी त्याने बराच वेळ चर्चा केली, त्यानंतर यशस्वीला मैदान सोडावे लागले. विशेष बाब म्हणजे पंचांनी राखीव खेळाडूची परवानगी दिली नाही, ज्यामुळे रहाणेच्या संघाला काही षटके १० खेळाडूंसह मैदानावर राहावे लागले. मात्र, २० वर्षीय जैस्वाल तब्बल ७ षटकांनंतर मैदानात परतला.

 हेही वाचा :  “सगळं कायेदशीर, पण हे क्रिकेट नव्हे,” ‘बर्मी आर्मी’ची टीम इंडियावर टीका; भारतीयांनीही दिलं जशास तसं उत्तर 

सामनावीर जैस्वाल ठरला तर मालिकावीराचा पुरस्कार उनाडकटने पटकावला. या स्पर्धेच्या हंगामात सर्वाधिक धावा पश्चिमच्या जैस्वालने केल्या आहेत. त्याने ३ सामन्यात ९९.४०च्या सरासरीने ४९७ धावा केल्या आहेत. सर्वाधिक बळी साई किशोरने घेतले आहेत. त्याने २ सामन्यात १७ बळी घेतले आहेत. त्यामध्ये त्याने दोन वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे.